पुण्यात शिवसैनिकांकडून मशाल पेटवत आनंदोत्सव साजरा
भारतीय निवडणुक आयोगाकडून शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह दिले आहे. तर पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे. निवडणूक चिन्ह आणि पक्षाला नव्याने नाव मिळाल्याने पुण्यातील शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकूडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील महर्षी कर्वे पुतळयासमोर मशाल पेटवून आनंदोत्सव साजरा केला.
तर बंडखोर आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंधेरी तो झाकी है,महाराष्ट्र अभी बाकी है अशा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी मनपाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार सहित बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकूडे म्हणाले की, शिवसेनेने ४० आमदाराना सर्व काही दिले. पण आज त्याच आमदारांनी बंडखोरी करून शिवसेनेच धनुष्यबाण गोठविण्याच पाप केल आहे.आता निवडणूक आयोगाने अंधेरी निवडणुकी करीता मशाल चिन्ह दिले आहे.पण आमचा आमच्या पक्षाचा इतिहास आहे.मशाल चिन्ह मिळाल्यानंतर तो उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतो आणि तो संदेश राज्यभरात जातो.त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीनंतर राज्यात होणार्या निवडणुकीमध्ये बंडखोराना या मशालीच्या माध्यामातून जनता त्यांची जागा दाखवली जाईल,अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.