दिवाळी पहाट कार्यक्रमांना उद्यानात तूर्त बंदी
पुणे : दिवाळीनिमित्त होणाऱ्या दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असले तरी महापालिकेच्या उद्यानांमध्ये या कार्यक्रमांना तूर्त तरी मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशात दिवाळी पहाट बाबत उल्लेख नसल्याने प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. असे महापलिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
: १६ संस्थांचे प्रस्ताव
पुण्यात दिवाळीमध्ये अनेक सामाजिक संस्था, प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या उद्यानांसह खासगी मंगल कार्यालये, लॉन्समध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करतात. यामध्ये विशेष करून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना पुणेकर भल्या पहाटे गर्दी करतात. गेल्यावर्षी शहरात कोरोनाचे निर्बंध असल्याने खासगी ठिकाणांसह उद्यानांमध्ये कार्यक्रम घेता आले नव्हते. यंदा बहुतांश निर्बंध हटवले आहे, दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सुमारे १६ संस्थांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. मात्र, त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
महापालिकेची उद्याने सकाळी ६ ते १० या वेळेत खुली आहेत. सकाळी ६ पूर्वी उद्याने उघडण्यास परवानगी दिलेली नाही. तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमांबाबत शासनाकडूनही लेखी आदेश नसल्याने हे उद्याने उघडता येणार नाहीत. मात्र, खासगी ठिकाणी कार्यक्रम घेता येण्यास बंदी नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत उपायुक्त राजेंद्र मुठे म्हणाले, ‘‘दिवाळी पहाट कार्यक्रमाबाबत शासनाकडून आदेश आलेले नाहीत. मात्र याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’
COMMENTS