HPV Vaccine Pune News | पुणे शहरातील ९ ते १३ वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीची १ मात्रा मोफत
| सर्व्हायकल कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचे उद्धघाटन
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका व जीविका फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील ९ ते १३ वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीची १ मात्रा मोफत देण्याबाबत करारनामा झाला असून, सदर लस सामाजिक दायित्व योजना यांचे माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. २ मार्च रोजी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या शुभहस्ते व अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांचे प्रमुख उपस्थितीत शरदचंदजी पवार अकॅडमी ऑफ ई लर्निंग, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे ४११०४१ येथे कर्करोग प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
भारतामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. ICMR अंतर्गत राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार २०२२ साली सुमारे ७९,००० नवीन रुग्ण आणि ३४,००० पेक्षा जास्त मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाले आहेत. या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे Human Papillomavirus (HPV) संसर्ग होय. HPV हा Papillomaviridae कुटुंबातील विषाणू असून त्याचे २०० पेक्षा अधिक प्रकार आहेत. यापैकी HPV-16 आणि HPV-18 हे प्रकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी सर्वाधिक जबाबदार आहेत. भारतामध्ये सुमारे ८३% रुग्णांमध्ये हे दोन प्रकार आढळतात. त्यामुळे HPV लसीकरण अत्यंत प्रभावी ठरते.

अध्यक्षीय भाषणात महापौर यांनी “आजचा हा क्षण केवळ औपचारिक कार्यक्रम नाही, तर एक ऐतिहासिक पाउल आहे. महानगरपालिका स्तरावर अशा प्रकारचा उपक्रम सुरु करणारी पुणे महानगरपालिका हि देशातील पहिली महानगरपालिका ठरत आहे. याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. या राष्ट्रीय मिशनला पूरक आणि अधिक बळकटी देण्यासाठी पुणे महानगरपालिका, जीविका फौंडेशन आणि CSR भागीदार यांच्या सहकार्याने आम्ही एक पाउल पुढे टाकत आहोत. मोफत HPV लसीकरणाद्वारे ९ ते १३ वयोगटातील सर्व मुलींना सर्व समावेशक संरक्षण मिळेल आणि पुणे शहरात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध एक मजबूत संरक्षण कवच उभे राहील . हे अभियान आपल्या शहरातील मुलींच्या आरोग्याचे आणि त्यांच्या उज्वल भविष्याचे संरक्षण करण्याच्या दिशेने उचललेले एक ऐतिहासिक पाउल आहे”.
कार्यक्रमास उप महापौर परशुराम वाडेकर, पक्ष नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट ) सोपान चव्हाण, अध्यक्षा शहर सुधारणा समिती स्मिता वस्ते, अध्यक्षा महिला व बालकल्याण समिती अल्पना वर्पे, अध्यक्षा नाव समिती श्रीमती पल्लवी जावळे, अध्यक्ष शिक्षण समिती अरुण राजवाडे, स्थानिक नगरसेविका ज्योती गोसावी, स्थानिक नगरसेवक सचिन मोरे आणि श्रीकांत जगताप, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रायोगिक तत्वावर उद्घाटन करण्यात आले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर यांनी सदर लस अत्युच्च दर्जाची असून योग्य तापमानात सनियंत्रित केली असल्याने प्रभावी असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थिनींनी इंजेक्शनची भीती न बाळगता लस घ्यावी तसेच एखाद्या विद्यार्थिनीस थोडा ताप येणे, इंजेक्शनच्या जागी सूज येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी असल्यास त्याकरीता AEFI KIT उपलब्ध असल्याचे सांगितले.

महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये ९ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींना लसीच्या उपलब्धतेनुसार मोफत लस देण्यात येणार असल्याचे सांगितले व त्याकरीता अधिकाधिक सामाजिक दायित्व योजना अनुदानाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच सदर वयोगटातील शाळा बाह्य मुलींना या लसीची तितकीच आवश्यकता असल्याचे व त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यानंतर मा. महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या शुभहस्ते फीत कापून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. प्रसंगी ७५ विद्यार्थिनींना CERVIVAC लसीचा एक डोस देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात ५ मुलींना लसीकरणाचे प्रमाणपत्र माननियांच्या हस्ते देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. लसीकरण अॅम्ब्युलंस वाहनास माननियांच्या व विद्यार्थिनींच्या हस्ते झेंडा दाखवून अभियानास सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यात आले.

COMMENTS