सरकार पडणार, असे किती दिवस बोलणार?
पंकजा मुंडे यांनी स्वकीयांना सुनावले
बीड : आज विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील भगवानगड येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कडून मोठ्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाषणात मुंडेनी जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर आवाज उठवणार असल्याचा इशारा सरकारला दिला. शिवाय स्वकीयांना ही सुनावले. मुंडे म्हणाल्या कि किती दिवस सरकार पडणार असे बोलणार. असे बोलून काही होत नसते. तुम्ही जनतेसाठी काय करता, हे महत्वाचे आहे, असे मुंडे म्हणाल्या.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंकजा मुंडेंनी मंचावरुन आपल्या समर्थकांच्या गावांची नावे घेतली. यादरम्यान समर्थकांकडून मोठ्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणतात की, दसरा आणि दसऱ्याची आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा ही कायम ठेवण्यासाठी या उन्हात घरची पुरणपोळी सोडून तुम्ही सर्वजन येथे उपस्थित झालात, मी नतमस्तक आहे.
या मेळाव्याने कधीकाळी सत्ता पाहिली
हा मेळावा होईल का नाही चर्चा होती, मेळावा नको बोलले कारण सत्ता नाही. कधीकाळी या मेळाव्याने सत्ता पाहिली. मुंडे साहेब सत्तेत नसताना या मेळाव्याने लाखोची संख्या पाहिली, पण कशे राजासारखे राहिलात. कुणी म्हणे अतिवृष्टी आहे कुणी म्हणे कोरोना आहे, लोकांची मनस्थिती नाही. मी म्हटलं अशाच लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे. अधिकाऱ्यांनी विचारलं की लोक येणार, मी म्हटलं मला माहित नाही पण मी जाणार. एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात, मला असं वाटतंय की माझ्यासमोर भगवान श्रीकृष्ण साक्षात आहेत.
पक्षाला घरचा आहेर
सावरगावच्या भूमीतून पंकजा मुंडे यांची तोफ प्रचंड धडाडली. अत्यंत अवेशात आणि आक्रमकपणे पंकजा मुंडे यांनी आपले मुद्दे मांडले. हे मुद्दे मांडतानाच त्यांनी थेट स्वपक्षीयांनाही जोरदार टोले लगावले. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडणार की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतो सरकार पडणार आणि सत्ताधारी म्हणतात सरकार पडणार नाही. आता यातून बाहेर पडा. विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत लक्ष घाला, असा घरचा आहेरच पंकजा यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
महिला अत्याचारावरुन राज्य सरकारवर निशणा
यावेळी पंकजा मुंडेंनी राज्यातील परिस्थितीवरुन सरकारवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘काय चालंलय महाराष्ट्रात? स्त्रियांचे प्रश्न वाढलेत, रोज पेपर उघडला, टीव्ही लावली की बलात्काराच्या घटना दिसतात. महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का ? पण, माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास उघडे आहेत.’
आज कुणाबाबतही काही बोलणार नाही
‘माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे, या स्थानावर उच्चार करायचा नाही असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.’ असं सांगून पंकजा यांनी आपल्या भाषणाचा रोख स्पष्ट केला. काही लोकांना वाटतंय मी घरात शांत बसले. ते लोक आज खूश असतील. पण माझा दौरा लिहून घ्या, मी आता 17 ते 20 तारखेपर्यंत दिल्लीत आहे. त्यानंतर मी 23 ते 25 मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात आहे. नंतर 12 डिसेंबरला ऊसाच्या फडामध्ये ऊसतोड कामगारांसोबत जाऊन मी गावागावात संवाद साधणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
COMMENTS