Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप
Dr Babasaheb Ambedkar – (The Karbhari News Service) – गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पार्टीची मनमानी सत्ता असल्याने सर्वत्र अनागोंदी माजली आहे. परभणीत पवित्र संविधानाची झालेली विटंबना, त्यानंतर आंबेडकरी जनतेवर झालेले अत्याचार, आंबेडकरी चळवळ येथील धडाडीचे कार्यकर्ते शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची लाठीमार करून करण्यात आलेली हत्या, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, भाजपचे मग्रूर नेते अमित शहा यांनी संसदेत केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या सर्व बाबी अत्यंत संतापजनक आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
जनसामान्यांचा हा संताप व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाचे फलक दाखवून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. त्यांच्या सरकारचा वरदहस्त असलेल्या गुंडांनी एका सरपंचाची निर्घृण हत्या केली आणि सरकार मात्र गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. परभणीत झालेला संविधानाचा अपमान व देशाच्या संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत मग्रुरीने केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान अत्यंत संतापजनक आहे. देवेंद्र फडणवीस व अमित शहा दोघांनी जनतेची माफी मागून राजीनामा द्यावा.” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली.
या आंदोलनास प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात माज़ी आमदार श्री जयदेव गायकवाड़, किशोर कांबळे , स्वातीताई पोकळे, शेखर धावडे, नरेश पगडालू, फाईम शैख़, श्रद्धा जाधव , दीपक कामठे, अजिंक्य पालकर, कणव चव्हाण, गौरव जाधव , आशाताई साने, अनीताताई पवार , अर्जुन गानजे, सारिकाताई पारेख, मयूर गायकवाड़, लखन वाघमारे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS