पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार
| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय
पुणे | पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण भरले असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशातच आगामी काळातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत.
| असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.