महापारेषणने ८९ कोटी खर्च करून बांधलेलं हिंजवडी ४०० केव्ही सबस्टेशन सात वर्षांपासून धूळ खात पडून!
पुणे | माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार महापारेषण या राज्य सरकार च्या कंपनीने २०१६ साली हिंजवडी येथे ८९ कोटी रुपये खर्च करून ४०० केव्ही सबस्टेशन उभे केले , ज्यामध्ये १६७ एमव्हीए क्षमतेचे तीन पाॅवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले. मात्र हे तीनही पाॅवर ट्रान्सफॉर्मर गेल्या ७ वर्षांत उपयोगातच न आणल्याने धूळ खात पडून आहेत. या तीनही पाॅवर ट्रान्सफॉर्मरची गॅरंटी, वाॅरंटी संपुष्टात आली आहे. यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
वेलणकर यांच्या निवेदनानुसार महाराष्ट्राचं आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी तील मोठमोठ्या कंपन्यांना विनाव्यत्यय वीजपुरवठा करता यावा म्हणून हे सबस्टेशन प्रचंड पैसे खर्च करून उभारण्यात आले. मात्र गेले सात वर्षे हे सबस्टेशन वापराविना पडून असल्याने कोट्यावधी रुपये पाण्यात जाण्याची भिती आहे. आता यातील दोन पाॅवर ट्रान्सफॉर्मर जेजुरी आणि कळवा येथे हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. या ट्रान्सफॉर्मरची बंद अवस्थेत असूनही नियमित देखभाल झाली असेल( जी शक्यता कमीच आहे) तर काही काळ तरी ते वापरात येऊ शकतील . या सबस्टेशन चा वापर न होण्याचं मुख्य कारण म्हणजे यासाठी लागणारा ४०० केव्ही चा सप्लाय उपलब्ध होण्यासाठी आजवर येथे ४०० केव्हीच्या केबल्सच टाकण्यात आलेल्या नाहीत. हे म्हणजे धरण बांधायचे आणि सिंचनासाठी कालवेच बांधायचे नाहीत अशासारखे झाले.* या ४०० केव्हीच्या केबल्स टाकणे, त्यासाठी मोठाले टाॅवर्स उभारणे हे प्रचंड वेळखाऊ काम असल्याने पुढील काही वर्षे तरी हे सबस्टेशन वापरात येऊ शकणार नाही. एकीकडे वीजेची वाढती बिलं भरताना सामान्य ग्राहकांची दमछाक होत आहे तर दुसरीकडे महापारेषण सारखी कंपनी नागरिकांच्या बिलांमधून मिळालेले कोट्यावधी रुपये पाण्यात घालते आहे हे संतापजनक आहे. अशी धूळ खात पडून असलेली आणखीही सबस्टेशन उर्वरीत महाराष्ट्रात असू शकतात ज्यासाठी नागरीकांच्या कष्टाचे शेकडो कोटी रुपये वायाच गेले आहेत. असे ही वेलणकर यांनी म्हटले आहे.
—-
आमची मागणी आहे की या हिंजवडी सबस्टेशन सह उर्वरीत महाराष्ट्रात अशी किती सबस्टेशन किती काळापासून बंद अवस्थेत पडून आहेत. याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि मुख्य म्हणजे हे पाण्यात गेलेले कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून वसूल करण्यात यावेत.
– विवेक वेलणकर , अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे