पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे होणार सामुहिक पठण
: प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांची संकल्पना
पुणे : मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी हनुमान चालीसाचे सामुहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे.
गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा दावा असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ मे पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत.
दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत. सुमारे २० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्यांचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या दिवसभरातील राज ठाकरे यांचे अन्य कार्यक्रम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.
COMMENTS