GPA | जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड

HomeBreaking Newsपुणे

GPA | जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड

Ganesh Kumar Mule Apr 03, 2023 5:37 AM

Pune Congress | येणारा महिना पक्षासाठी समर्पित करा | पुणे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना
Tender | PMC Commissioner | निविदा मंजुरीबाबत महापालिका आयुक्त खात्यांना लावणार शिस्त 
KYC Service | KYC म्हणजे काय | ते वेळोवेळी अपडेट करणे का महत्त्वाचे आहे | जाणून घ्या त्याच्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 

जीपीए च्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जोशी यांची निवड

| नवीन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

| सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याची डॉ. जोशी यांची ग्वाही

वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (General practitioners association) च्या अध्यक्षपदाचा पदभार डॉ. श्रीराम जोशी यांनी रविवारी स्विकारला. संघटनेच्या २०२३-२४ या वर्षासाठीच्या कार्यकारीचा पदग्रहण समारंभ पार पडला. डॉक्टर म्हणून काम करताना दैंनदिन जीवनात येणार्‍या अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपल्या कार्यकाळात विशेष प्रयत्नशील राहणार असून सर्वांना एकत्र घेऊन काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जोशी यांनी यावेळी दिली. (GPA)

टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या उपमुख्य आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. अनंत बागूल, तथास्तु हेल्थकेअरच्या डॉ. नाझीर झुबैर अहमद, प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक योगेश सोमण हे उपस्थित होते. संघटनेचे मावळते अध्यक्ष हरिभाऊ सोनवणे यांच्याकडून डॉ. जोशी यांनी पदभार स्विकारला. डॉ. शुभदा जोशी (उपाध्यक्ष), डॉ. आप्पासाहेब काकडे (सचिव), डॉ. भाग्यश्री मुनोत (सचिव), डॉ.सुनील भुजबळ (खजिनदार), डॉ. राजेंद्र दोशी (सहसचिव), डॉ. शेखर येडगे (सहसचिव), डॉ. हरिभाऊ सोनवणे (आयपीपी) यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती यावेळी करण्यात आली. पुढील एक वर्षासाठी ही कार्यकारिणी काम पाहणार आहे.

पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि शहरातील विविध भागात काम करणारे डॉक्टर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोघेही सर्वसामान्य नागरिकांसाठीच सदैव कार्यरत असतात. त्यामुळे खासगी प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविल्या जाणार्‍या योजनांची माहिती आपल्याकडे येणार्‍या रूग्णांना द्यावी, अशी अपेक्षा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या उपमुख्य आरोग्य प्रमुख डॉ. बळीवंत यांनी व्यक्त केली. उपचारांसाठी क्लिनिकमध्ये आलेल्या संशयित आजारांच्या रूग्णांची माहिती संघटनेच्या सभासदांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित डॉक्टरांना केले.
गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला असून हा व्यवसाय करणार्‍यांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. आपले कर्तव्य पार पाडताना डॉक्टरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, डॉक्टरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉ. अनंत बागूल यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडले. या कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव डॉ. आप्पासाहेब काकडे यांनी केले. तर आभार डॉ. भाग्यश्री मुनोत यांनी मानले.
————-