गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर कालवश
92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलं, त्या देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशी माहिती दिली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. (Lata Mangeshkar Passes Away)
लता मंगेशकर (Lata Mangeshkar ) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेशच्या इंदूर (Indore) शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर या सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जायचे. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहे.
लता मंगेशकर या ‘भारतरत्न’ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न – १९९८) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला होता. लता मंगेशकर हे नाव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये१९७४ ते१९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे.
संगीत क्षेत्रातील वेगवेगळे विक्रम लता मंगेशकर यांच्या नावावर नोंदले गेले आहे. त्यात सर्वाधिक चित्रपटांमध्ये गायन, सर्वाधिक गाण्यांचे गायन, वेगवेगळ्या भाषांमध्ये गायन अशा प्रकारचे ते विक्रम आहेत. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
COMMENTS