बीएमसीसीच्या वतीने फिल्म मेकिंग मधील पहिला पदवी अभ्यासक्रम
पुणे : चित्रपट आणि नाट्यनिर्मितीच्या शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने ‘भरतसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत ‘बी. व्होक फिल्ममेकिंग अँड ड्रामॅटिक्स’ हा या विषयातील देशातील पहिला वैकल्पिक (व्होकेशनल) पदवी अभ्यासक्रम जून २०२२ पासून सुरू करणार असल्याची घोषणा डीईएसच्या परिषद आणि नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद रावत, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, अभिनेते शरद पोंक्षे, योगेश सोमण, समन्वयक प्रशांत गोखले, माध्यमकर्मी गिरीश केमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या पुरोहित म्हणाल्या, ‘या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता दिली आहे. यूजीसीच्या वैकल्पिक अभ्यासक्रम धोरणानुसार सहा महिन्यांनंतर प्रमाणपत्र, एक वर्षानंतर पदविका, दोन वर्षांनंतर प्रगत पदविका आणि तीन वर्षांनंतर पदवी प्रदान केली जाणार आहे. कोणत्याही शाखेची बारावीची परीक्षा किंवा १०+२ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील. प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. पहिल्या वर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. https://www.bmcc.ac.in/?page_id=4252 या वेबपेजवर सर्व माहिती उपलब्ध आहे.
पोंक्षे म्हणाले, ‘सिनेमा आणि नाट्य निर्मितीचे एकाच ठिकाणी प्रशिक्षण देणारा हा पहिलाच अभ्यासक्रम असेल. या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. प्रत्यक्ष काम केल्याशिवाय आणि प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाबरोबर विविध प्रकल्पांद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रयोग निश्चित यशस्वी होईल.’
सोमण म्हणाले, ‘या अभ्यासक्रमात चित्रपट नाट्यनिर्मिती बरोबरच पटकथालेखन्, दिग्दर्शन, छायांकन, संकलन, ध्वनी, प्रकाश योजना, निर्मिती, व्यवस्थापन आणि अभिनय यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात प्रावीण्य मिळवता येईल. केवळ ग्लॅमर आणि पैशासाठी विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येऊ नये. सिनेनाट्य सृष्टीचा ध्यास घेऊन या क्षेत्रातील नवीन ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी हा पदवी अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकेल.’
भरतसृष्टी प्रकल्प
बीएमसीसीच्या आवारात १५ हजार चौरस फूट जागेवर भरतसृष्टी हा प्रकल्प साकारला जात आहे. स्वरलता हा ध्वनीमुद्रण स्टुडिओ तर स्वरांकन या नियंत्रण कक्षामध्ये ध्वनी संस्करण करण्यात येणार आहे. विश्वदर्शन या मोठ्या स्टुडिओत विद्यार्थ्यांना आभासी विश्व निर्माण करता येणार आहे. संगीत रंगभूमीची परंपरा चालविणारे गंधर्व मंडळी आणि दादासाहेब तोरणे यांचे नाते जपणारे सरस्वती सिनेटोन हे कलादालन साकरण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके आणि ग.दि. मा. दालनांमधून चित्रपटसृष्टीचा वसा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अयोध्येचा राजा ह्या पहिल्या मराठी बोलपटाशी नाते जपणारे प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे. गुरुदत्त, राजा परांजपे, राजदत्त, राज कपूर अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांशी नाते जोडणारे गुरुराज कक्ष येथे असणार आहे. आपल्या परंपरांशी नाथ बांधून यंत्रणांशी सुसज्ज अशा भरतसृष्टीत व्हर्चुअल रिअलिटीमध्ये जगणार्या नव्या पिढीला चित्रपट-नाटक परंपरांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही माहिती माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी दिली.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विक्रम गोखले, लेखक-रंगकर्मी अभिराम भडकमकर, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे, योगेश सोमण, चिन्मयी सुमीत, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, सचिन वाघ, दिग्पाल लांजेकर यांचा अभ्यास मंडळात समावेश आहे.
COMMENTS