हांडेवाडीतील भाजी मंडईला आग; 90 स्टॉल जळाले
पुणे : हडपसरमधील हांडेवाडी भागात असलेल्या भाजी मंडईत मध्यरात्री आग लागली. आगीत भाजीपाल्याचे ९० स्टाॅल जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत भाजीपाल्याचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही.
हांडेवाडी रस्त्यावर चिंतामणीनगर परिसरात भाजी मंडईत मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर लाकडी स्टाॅलने पेट घेतला. स्टाॅलमध्ये भाजीपाला आणि साहित्य होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत भाजीपाल्याचे ९० स्टाॅल भस्मसात झाले. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे तसेच तांडेल विलास दडस व जवान अनिमिष कोंडगेकर, चंद्रकांत नवले, बाबा चव्हाण, दशरथ माळवदकर, विशाल यादव, प्रकाश शेलार यांनी सहभाग घेतला.