शिक्षण विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचा मार्ग मोकळा
| समयोजन प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजूरी
| जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन
पुणे | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केले. सरकारच्या आदेशानुसार मंडळ हा एक महापालिकेचा विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या जवळपास 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (PMC Education Department)
पुणे महानगरपालिकासेवा प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग ,नगरसचि व कार्यालय,मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation)
– वर्ग 4 मधील जास्त कर्मचारी
प्रस्तावानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) स्वीय सहा. लघुलेखक (वर्ग-३), कनिष्ठ अभियंता (वर्ग-३), प्रशासन अधिकारी (वर्ग-२), अधिक्षक (वर्ग-३), उपअधिक्षक (वर्ग-३), वरिष्ठ लिपिक (वर्ग-३), लिपिक टंकलेखक (वर्ग- ३), शिपाई (वर्ग-४), रखवालदार (वर्ग-४), बिगारी (वर्ग-४) व माळी (वर्ग-४) या पदावरील शिक्षकेतर पदावरील सेवकांच्या सेवाजेष्ठ्ता पुणे मनपाव्या आस्थापनेवरील सेवकांमध्ये सेवाज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट करणे, पुणे मनपाकडील मंजूर पदे आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडील मंजूर पदे, कार्यरत पदे एकत्रित करून एकच रोस्टर तयार करणे आणि सदर सेवकांच्या बदल्या मनपाच्या इतर खात्यामध्ये करणेबाबत समितीने एकमताने निर्णय घेतलेला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील समावेशन करावयाचे पदावरील कर्मचारी पद निहाय संख्या जवळपास 450 आहे. यामध्ये वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची संख्या 200 हून अधिक आहे.
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरच प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे मात्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा गेल्या बऱ्याच वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.