Contract workers | पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

HomeपुणेBreaking News

Contract workers | पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

Ganesh Kumar Mule Oct 02, 2022 3:23 AM

Maratha Samaj Survey in Pune City | Pune PMC | मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण करण्याबाबत पुणे महापालिकेने पुणेकरांना केले हे आवाहन | जाणून घ्या सविस्तर!
Metro | Smart City | SRA | गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा |मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
Loksabha Election | Shivsena Pune | शिवसेनेचे मिशन 48 ..!  लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु 

पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार

पुणे :- पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे दहा हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. हे सर्व कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागांमध्ये व कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुरक्षारक्षक, वाहन चालक, पाणीपुरवठा, साफसफाई विभाग, स्मशानभूमी कर्मचारी या व इतर अनेक विभागांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी  पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेट समोर इशारा सभेचे आयोजन राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

या सभेला खूप मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगारांनी हजेरी लावली. यावेळी कंत्राटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. जोरदार पाऊस आला तरी या पावसातही इशारासभा चालूच राहिली. याची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब यांनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना चर्चेसाठी बोलावले व निवेदन स्वीकारले. यामध्ये या प्रश्नांसाठी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीमध्ये कंत्राटी कामगारांचे सर्व प्रश्न एकत्रित आपण समन्वयाने सोडू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या इशारा सभेमध्ये कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या
1) या दिवाळीला कायम कामगारांप्रमाणेच एक पगार व एकोणीस हजार रुपये बोनस मिळाला पाहिजे.
2) किमान वेतन कायद्यामध्ये जाहीर केलेला फरक फेब्रुवारी 2015 ते एप्रिल 2021 हा मिळाला पाहिजे.
3) कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहतील.
4) कंत्राटी कामगार व कायम कामगार हे समान काम करत असल्यामुळे कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांच्या एवढाच पगार मिळाला पाहिजे.
अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या इशारासभेला राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी संबोधित केले. श्री शिंदे यांनी यावेळी कंत्राटी कामगारांच्या वर गुलामासारखी वागणूक पुणे महापालिकेमध्ये मिळत असल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला. कधीही कंत्राटी कामगारांचा वेळेवर पगार होत नाही. प्र. फंड व ई एस आय सी चे कार्ड देखील या कंत्राटी कामगारांना मिळत नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही याची दखल संबंधित अधिकारी घेत नाहीत. याचा निषेध यावेळी व्यक्त केला. जर या कंत्राटी कामगारांचे प्रश्न वेळीच सोडवले गेले नाहीत तर मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी हे सर्व कामगार सकाळी दहा वाजल्यापासून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेटवर निदर्शने आंदोलने करतील व त्यावेळी सर्व कांत्राटी कामगार यामध्ये सहभागी होतील असा इशारा दिला.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, पुणे मनपा मधील कंत्राटी सुरक्षा रक्षक, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी, स्मशानभूमीचे कर्मचारी, कचरा वाहतूक करणारे वाहन चालक, अशा विविध खात्यातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.