निवडणूक लांबल्याने स्थायी समिती अध्यक्ष पदाबाबत घडणार इतिहास!
: थोड्या दिवसासाठी नवीन अध्यक्ष कि जुन्याच अध्यक्षांना संधी मिळणार?
पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सभासदांची मुदत 1 मार्च रोजी संपणार असल्याने त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद बदलणार की सध्याचे अध्यक्ष हेमंत रासनेच अध्यक्ष राहणार, याबाबत महापालिकेत विभिन्न तर्क वितर्क लढवले जात आहेत. आताचे अध्यक्ष दावा करत आहेत की मीच अध्यक्ष राहू शकतो. जर तसे नाही झाले तर 10 ते 12 दिवसासाठी अध्यक्ष बनण्यासाठी कोण पुढे येणार, याबाबतही चर्चा सुरु आहे. दरम्यान यामुळे मात्र महापालिकेत इतिहास घडणार आहे. कारण अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे.
: 14 मार्च संपणार मुदत
महापालिकेची मुदत 14 मार्चला संपत आहे. निवडणूक वेळेत होणार नसल्यामुळे 14 मार्चला सर्व सभासदांची मुदत संपत आहे. त्यामुळे स्थायी समितीत नव्या सभासदांची नेमणूक होणार का? आणि अध्यक्ष बदलणार का? 2022-23 चे अंदाजपत्रक कोण मांडणार? याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सध्याचे अध्यक्ष हेमंत रासनेच यावर्षीचे अंदाजपत्रक मांडणार, अशी चर्चा होती. याविषयी विधी विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे. मात्र नियमाप्रमाणे एक मार्चच्या आधी स्थायी समितीच्या ज्या आठ सदस्यांची मुदत संपणार आहे, तेथे नवे आठ सदस्य नेमण्याविषयीची निवडणूक घ्यावी लागणार आहे.
त्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक केल्यानंतर या निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील आणि अर्ज मागवण्यात येतील. प्रशासनाने राज्यसरकारला पत्र पाठवून या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन मागितले होते. यावर राज्यसरकारचे काहीच उत्तर आले नाही.
महापालिका निवडणूक मे-जूनपर्यंत पार पडण्याची शक्यता आहे. अशावेळी दोन-तीन महिन्यांसाठीच स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नवीन नेमणूक होईल की आहे त्याच अध्यक्षांना पुन्हा संधी मिळेल याविषयी तर्क-वितर्क लढवले जात आहेत. रासने यांना सलग तीन वर्षे अध्यक्षपद मिळाले आहे. दरम्यान सदस्य निवडल्यानंतर अध्यक्ष पदाची निवड होते. यात 5-6 दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे नवीन अध्यक्ष जरी झाला तरी त्याला अवघे आठच दिवस मिळतात. त्यामुळे त्यासाठी कोण पुढे येणार, याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.
COMMENTS