Dr Siddharth Dhende Pune | संवाद सभेत नागरिकांचा एल्गार | अवैध धंदे, नियमबाह्य कामांना आळा घालण्याची पोलिस, महापालिका अधिकाऱ्यांकडे मागणी
| डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा प्रभाग दोन मध्ये संवाद सभेचा अनोखा उपक्रम
शाळांच्या परिसरात असणाऱ्या हुल्लडबाजांवर जरब बसवा. अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळा. नियमबाह्य डीजे वाजविनाऱ्यांवर कडक कारवाई करा. या मागण्यांसह अनेक समस्यांवर बोट ठेवत, प्रभागातील चुकीच्या कामाविरोधात संवाद सभेतून नागरिकांनी एल्गार पुकारला.
पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मध्ये ‘नागरिकांचे संरक्षण’ या विषयावर गुरुवारी (दि. 28) संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. पोलिस आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित या सभेत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला.
या वेळी येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय नायकल, येरवडा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे, कल्याणीनगर विभाग महावितरणचे सहायक अभियंता संतोष तळपे आदीसह प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येरवडा पोलिस स्टेशनचे अधिकारी, तसेच महापालिका अधिकारी यांनी नागरिकांच्या मागण्या नमूद करून घेतल्या. त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.
या वेळी येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, प्रभागातील नागरिकांनी मांडलेल्या अडचणींचे निराकरण करू. तक्रारींची दखल घेऊन शाळेच्या आवारात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करू. लेखी तक्रार देणाऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवले जाईल. मात्र चुकीचे काम करणाऱ्या लोकांवर जरब बसवू, असे आश्वासन पोलिस निरीक्षक कदम यांनी दिले.
—————————
: नागरिकांनी मांडल्या या समस्या
या मध्ये प्रभागातील शाळांच्या परिसरात हुल्लडबाज थांबलेले असतात. त्याचा विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांना त्रास होतो. त्यांच्यावर आळा घाला. प्रभागातील पदपथ मोकळे करा. अतिक्रमणवर कारवाई करा. शाळांनी मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालावे. शाळांच्या बाहेर सीसीटीव्ही बसवावे. प्रभागातील दारू विक्री, गुटखा विक्री, अवैध धंदे बंद करावेत. क्राईम स्पॉट, चौक मोकळे करणे, मोकळ्या जागेत होणारे चुकीचे काम थांबवा. रात्री दहा नंतर वाजणारे डीजे बंद करावेत. त्याचा वयोवृद्ध लोकांना त्रास होतो. नियमबाह्य डीजे वाजविणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. कालच विमाननगर येथे गॅस सिलेंडरचे स्फ़ोट झाले आहेत. खबरदारी म्हणून प्रभाग दोन मधील बेकायदेशीर गॅस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रभागातील भिंतींवर चुकीचे केलेलं पेंटिंग काढून भिंत सुशोभित करा. आदींसह विविध मुद्दे नागरिकांनी मांडले.
——————————
माझ्या प्रभागातील विविध समस्यांवर नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. काही जण लेखी तर काही जण वॉट्सप वर मेसेज करून सांगत होते. नागरिकांच्या या तक्रारी प्रत्यक्ष पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जाव्यात या उद्देशाने संवाद सभा आयोजित केली. त्यामध्ये नागरिकांनी देखील समस्या मांडल्या. त्या सोडविण्याबाबत पोलिस आणि महापालिका अधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवली
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपहापौर, पुणे महापालिका
———————————–