Dr Siddharth Dhende | भुयारी मेट्रोसह, संरक्षण विभागाच्या हद्दीतील बांधकामावर होणार सकारात्मक निर्णय
– केंद्रीय हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, मंगेश गोळे यांनी घेतली मंत्री मोहोळ यांची भेट
Pune News – (The Karbhari News Service) – रामवाडी मेट्रो स्टेशन ते पुणे एअरपोर्ट पर्यंत भुयारी मेट्रो मार्ग करू. तसेच संरक्षण हद्दीतील बांधकामाबाबत शंभर मीटरची अट वाढवण्याबाबत संरक्षण मंत्र्यांबरोबर बैठकीचे आयोजन करू, असे आश्वासन केंद्रीय हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन सह इतर समस्यांबाबत माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे यांनी मंत्री मोहोळ यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी भुयारी मेट्रो मार्ग करणे व संरक्षण हद्दीजवळील बांधकामाच्या किचकट अटींची माहिती दिली. यावेळी मंत्री मोहोळ यांनी सकारात्मक आश्वासन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
पुणे शहरापुढे वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थामध्ये अमुलाग्र बदल आणून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पुणे शहरासह येरवडा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे अनेक अपघात घडून त्यामध्ये निष्पाप बळी गेले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रामवाडी मेट्रो स्टेशन ते पुणे एअरपोर्ट पर्यंत मेट्रोचा मार्ग भुयारी करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्री मोहोळ यांच्याकडे केली.
तसेच संरक्षण विभागाच्या 100 मीटर हद्दीत बांधकाम करण्याला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना खो बसला आहे. विशेषतः पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील संरक्षण विभागाच्या भिंती जवळील असणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकासाला अडचणी येत आहेत. जुन्या झालेल्या या इमारतींचा पुनर्विकास होत नाही. त्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनाशी तात्काळ संपर्क करत भुयारी मार्ग करण्याबाबत योग्य सूचना दिल्या. याबाबत सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्यासोबत दिल्ली येथे बैठक आयोजित करून त्यामध्ये संरक्षण हद्दीच्या 100 मीटर परिसरातील बांधकामाबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थितांना दिले.
COMMENTS