Dr Rajendra Bhosale IAS | महापालिकेची कार्यालये, शाळांमध्ये ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम जल्लोषात होणार – पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले
| पुणे पुस्तक महोत्सवात महापालिकेचा सक्रिय सहभाग; सर्व विभागांद्वारे आवश्यक सोयी- सुविधा देणार; पुणेकरांनी मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन
Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे पुस्तक महोत्सवाच्या (Pune Book Festival) पार्श्वभूमीवर उद्या बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या कालावधीत पुणेकरांसाठी होणाऱ्या ‘शांतता… पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमात पुणे महापालिकेने (Pune PMC) सक्रिय सहभाग घेतला असून, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवक वाचन चळवळीत सहभागी होणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महापालिकेचे प्रशासन आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Pustak mahotsav)
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, त्या अनुषंगाने विविध सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव पुणेकरांचा असल्याने पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर या महोत्सवातत सहभागी होणार आहे. त्यांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी उद्या बुधवारी ११ डिसेंबरला ‘ शांतता…पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पुणे महापालिकेचे प्रशासन सक्रिय सहभाग होणार असून, पालिकेचे अधिकारी कर्मचारी आपल्या आवडीचे पुस्तक वाचून वाचन चळवळ बळकट करण्यासाठी योगदान देणार आहेत.
या उपक्रमाच्या निमित्ताने पुणे महापालिकेच्या सभागृहात अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी वाचनाचे महत्त्व पटविणाऱ्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि महापालिकेच्या २७२ शाळांमध्ये हा उपक्रम उत्साहात साजरा होणार आहे. या उपक्रमात प्राथमिक विभागाचे ६६ हजार, तर माध्यमिक विभागाचे १६ हजार विद्यार्थी, तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या उपक्रमाद्वारे पुणे शहराला ‘ वाचन संस्कृती जपणारे शहर ‘ अशी नवी ओळख देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
हा उपक्रम विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालये, पुणे विमानतळ, मेट्रो स्टेशन, पीएमपीएमएल बसस्थानक, रिक्षा थांब्यांवरही होणार आहे. अशा ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमात पुणेकरांनी उत्साहाने सहभागी होण्यासाठी साधारण ८ लाख नागरिकांच्या मोबाईलवर सहभागी होण्याबाबत संदेश पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे ३ लाख लोकांना ई-मेल पाठविण्यात येत आहे. पुणे पुस्तक महोत्सव आठ दिवस सुरू राहणार असून, त्यामध्ये हजारो नागरिक दरदिवशी येणार आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये महोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुणे महापालिका प्रशासन पुरविणार आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती भोसले यांनी दिली आहे……
———
पुणे पुस्तक महोत्सवात १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत मुलांसाठी चिल्ड्रेन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये महापालिकेच्या २७२ शाळांचा सक्रिय सहभाग असणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक चित्रपटांचा आनंद घेता येईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिली.
…..
या उपक्रमात महापालिकेचा सक्रिय सहभाग
…..
११ डिसेंबरला – शांतता… पुणेकर वाचत आहेत
१२ डिसेंबरला – संविधान शब्दाचा गिनीज बुक रेकॉर्ड
१३ डिसेंबरला – सरस्वती : गिनीज बुक रेकॉर्ड
१४ डिसेंबरला – ग्रंथदिंडी
१४ डिसेंबरला- पुणे पुस्तक महोत्सव उद्घाटन कार्यक्रम
२० ते २२ डिसेंबर – लिट फेस्टीव्हल
….
….
पुणे पुस्तक महोत्सवात उद्या शनिवारी ११ डिसेंबरला ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम दुपारी १२ ते १ या कालावधीत होईल. या कालावधीत आपल्याला आवडीचे किंवा जवळ असलेले पुस्तक वाचायचे आहे. पुस्तक वाचन करतानाचे छायाचित्र काढून ते pbf24.in/register या लिंकवर पाठवावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
COMMENTS