MSEDCL : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये : महावितरणचे आवाहन

HomeपुणेBreaking News

MSEDCL : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये : महावितरणचे आवाहन

Ganesh Kumar Mule Apr 28, 2022 2:20 AM

Agricultural power connections : Dr Nitin Raut : कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
Scientific Benefits of Barefoot Walking | तुम्ही आठवड्यातून एकदा अनवाणी चालणे का महत्वाचे आहे? | त्याचे फायदे आणि शास्त्रीय कारणे जाणून घ्या
PMC : electricity purchase : सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका 

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये

: महावितरणचे आवाहन

पुणे : ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पुन्हा पाठविण्यात येत आहेत. याआधी गेल्या जानेवारी हा प्रकार घडला होता. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारचे ‘एसएमएस’ व व्हॉट्स अॅप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. आर्थिक फसवणूकीची शक्यता असल्यामुळे या मेसेजला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजबिलाची रक्कम भरलेली नसल्याने वीजपुरवठा आज रात्री खंडित करण्यात येत आहे असा संदेश वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात येत असल्याचे पुन्हा प्रकार घडत आहेत. या मेसेजनंतर वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाईन पेमेंट लिंक पाठविण्यात येत आहे. मात्र मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे. अन्यथा आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. महावितरणकडून केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी (Sender ID) हा ‘एमएसईडीसीएल’ (MSEDCL) (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याबाबत कळविले जात नाही.

महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते. परंतु, वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे मेसेज हे बनावट आहे व त्यातून आर्थिक फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या वीजबिलासंदर्भात ‘एसएमएस’ किंवा पेमेंट लिंकला नागरिकांनी प्रतिसाद किंवा कोणतेही उत्तर देऊ नये. मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी चोवीस तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.