प्रत्येक गोष्टी मध्ये नफा बघू नका
| अंशदायी आरोग्य योजनेवरून माजी विरोधी पक्षनेत्यांनी प्रशासनाला सुनावले
पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र यातील काही तांत्रिक कारणामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र यावरून माजी विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे.
दीपाली धुमाळ म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात खाजगी कंपन्यांना नफा कमवून देणे व खाजगी कंपन्यांकडून सर्व कामे करून घेणे ही भूमिका योग्य नसून वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये चालू असलेली अंशदायी सहाय्य योजना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सुरू झालेली शहरी गरीब योजना या अत्यंत प्रभावीपणे राबवाव्यात अशी मागणी मी यानिमित्ताने करते.
धुमाळ पुढे म्हणाल्या तसेच मेडिक्लेम कंपन्यांचे उखळ पांढरे करणाऱ्यांना आवाहन करते की, आता बास झाले प्रत्येक गोष्टी मध्ये नफा बघू नका, माणूस कसा जगेल, त्याला कसे उपचार मिळतील, त्याला कशा सुविधा मिळतील याचा विचार करा.