चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा
| मोहन जोशी यांची मागणी
| न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण
पुणे | थोर पुरूषांची बदनामी प्रकरणात काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक केल्याप्रकरणी न्यायालयाने सरकारवर ताशेरे मारले. २५ हजार रूपयांचा दंड केला. सरकारवर ही वेळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अरेरावीमुळे आली. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा. अशी मागणी मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष कॉंग्रेस यांनी केली .
पाटील यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट केला म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यावर कारवाई केली होती.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले की पालकमंत्री पाटील यांनी या प्रकरणात सरकारी पदाचा गैरवापर केला. पोलिसांवर दबाव टाकला. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पाटील यांनी अवमानकारक वक्तव्ये केली होती. काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कुदळे यांनी त्याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला असा आरोप करून कुदळे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याआधी पाटील यांनी, याप्रकरणात कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन वगैरे भाषा वापरली.
पोलिसांच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने अटकेची कारवाई बेकायदा ठरवली आहे. तसेच सरकारला २५ हजार रूपयांचा दंडही केला आहे. पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे यात स्पष्ट दिसते. कसब्याच्या निवडणुकीतही त्यांनी याच प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे असे जोशी म्हणाले.