पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात
| ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत
पुणे – पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात आहे. गोदी मीडियाने पत्रकारितेचा घात केला आहे. पत्रकारितेला या गोदी मीडियापासून वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याउलट डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण होत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे आज वागळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, पुरस्कारार्थी सकाळच्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुरेंद्र पाटसकर, ‘एबीपी माझा’चे अभिजित कारंडे, पुढारीच्या बातमीदार सुषमा नेहरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वागळे पुढे म्हणाले, ‘‘मराठी पत्रकारिता बदलत आहे. ही पत्रकारिता आता उच्चवर्णियांपुरती मर्यादित राहिली नसून, ती आता बहुजनांकडे सरकत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ मुद्रित (प्रिंट) नाही.आता दूरदर्शन (टी.व्ही.), डिजिटल पत्रकारिता आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील पत्रकारिता ही मल्टिमीडिया झाली आहे. त्यामुळे ही सर्व माध्यमे ही एकमेकांशी पूरक आहेत. सध्या डिजिटल माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे.
त्यामुळे डिजिटल पत्रकारितेमुळे ट्रोलिंग होत असले तरी ट्रोलिंग हा गाळ आहे. अगदी सुरवातीच्या काळात वाहत्या पाण्यातूनसुद्धा असा गाळ येतच असतो. आजची पत्रकारिता हा गोदी मीडिया झाला आहे. या गोदी मीडियानेच पत्रकारितेचा मोठा घात केला आहे. माध्यम संस्था या जाहिरातीच्या आमिषाने विकल्या जात आहेत. काही पत्रकार सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून पत्रकारितेचे स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. यामुळे सध्याची पत्रकारिता अर्धमेली झाली आहे. यासाठी आपणच जबाबदार आहोत.’’
प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी पुरस्कारांमागची भूमिका विशद केली. पुरस्कारार्थी चैत्राली चांदोरकर यांच्या अनुपस्थितीत पती नीलेश यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारार्थी पाटसकर, कारंडे, नेहरकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश गुजर आणि अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत पाठक यांनी आभार मानले. यावेळी विश्वस्त वि.अ. जोशी,डॉ. सतीश देसाई, चारुचंद्र भिडे, प्रकाश भोंडे आदी उपस्थित होते.
विद्यापीठात वरुणराज भिडे अध्यासन ः डॉ. गोऱ्हे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकार वरुणराज भिडे यांच्या नावाने अध्यासन असावे, अशी इच्छा होती. यानुसार हे अध्यासन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्र दिले होते. या पत्रानुसार पाटील यांनी ही मागणी मान्य केली असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना सांगितले.
‘राज्यात वाचकांचे दबावगट निर्माण व्हावेत’
सध्या पत्रकार आणि संपादकांना स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. यासाठी ज्याप्रमाणे युरोपिय देशांमध्ये जसे वाचकांचे दबावगट आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही वाचकांचे दबावगट निर्माण होण्याची गरज आहे. वाचक आणि प्रेक्षक हेसुद्धा माध्यमांचे स्टेक होल्डर (भागधारक) असतात. यामुळे पत्रकारांना स्वातंत्र्य मिळून त्यांना वाचक आणि संविधानाकडे अधिक लक्ष देता येईल, असे मत निखिल वागळे यांनी यावेळी व्यक्त केले.