Deputy MOH PMC | उप आरोग्य अधिकारी पदासाठी अधिकारी पात्र असताना देखील पदोन्नती मिळेना! | माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची आयुक्तांकडे मागणी
PMC Officers Promotion – (The Karbhari News Service) – महापालिका आरोग्य विभागात प्रशासकीय ताण असताना देखील आणि अधिकारी पात्र असताना देखील त्यांना उप आरोग्य अधिकारी पदावर पदोन्नती दिली जात नाही. हे अन्यायकारक आहे. असे माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सेवा शिस्त, मनुष्यबळ संतुलन आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी DPC तातडीने आयोजित करून MO ते AMOH व AMOH ते Deputy MOH पदोन्नती देण्याचे निर्देश द्यावेत. अशी मागणी डॉ धेंडे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. (Pune PMC News)
४ वेळा पुढे ढकलण्यात आली पदोन्नती समितीची बैठक
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्याअंतर्गत ३ उप-आरोग्य अधिकारी पदे अस्तित्वात आहेत. दोन वर्षांपूर्वी एक उप-आरोग्य अधिकारी पद भरण्यात आले. दरम्यान नगर विकास विभागाने ३० जानेवारी रोजी महानगरपालिकेने दिलेल्या ठरावानुसार शासन निर्णय पारित करून आरोग्य अधिकारी, उप-आरोग्य अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल केला आहे.
त्यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत आजपर्यंत २ सप्टेंबर, ३० सप्टेंबर , २५ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर रोजी पदोन्नती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. तथापि चारही वेळेस बैठक होऊ शकली नाही.
आरोग्य विभागावर प्रशासकीय ताण
डॉ धेंडे यांनी पुढे म्हटले आहे कि, येत्या काही महिन्यात कार्यरत उप-आरोग्य अधिकारी वयोपरत्वे सेवानिवृत्त होत असल्याने तातडीने उप-आरोग्य अधिकारी पदे भरण्यात यावी. उप-आरोग्य अधिकारी पदभरतीनंतर रिक्त जागांवर ३ सहाय्यक आरोग्य अधिकारी यांची पदोन्नती करणे शक्य होऊन प्रशासकीय कामकाज सुरळीत होऊ शकेल. तसेच वैद्यकीय अधिकारी ते सहाय्यक आरोग्य अधिकारी व सहाय्यक आरोग्य अधिकारी ते उप-आरोग्य अधिकारी हि पदे रिक्त असून विभागावर ताण वाढला आहे. अधिकारी पात्र असूनही त्यांना पदोन्नती न मिळणे अन्यायकारक आहे. असे देखील धेंडे यांनी म्हटले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सेवा शिस्त, मनुष्यबळ संतुलन आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनासाठी DPC तातडीने आयोजित करून MO ते AMOH व AMOH ते Deputy MOH पदोन्नती देण्याचे निर्देश द्यावेत. ही कारवाई केल्यास कोविड काळात निस्वार्थ योगदान दिलेल्या डॉक्टरांना न्याय मिळेल आणि पुणे महानगरपालिकेची आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल. अशी मागणी डॉ धेंडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

COMMENTS