पीएमपीच्या कायम आणि बदली कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी
| कर्मचारी संघटना आक्रमक
पुणे | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र पीएमपीच्या सेवकांना याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. यावरून पीएमपीच्या कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बोनस नाही दिला गेला तर कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विस्फोट होईल आणि त्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची राहिल, असा इशारा संघटनानी दिला आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना ८.३३% सानुग्रह अनुदान आणि १९००० ची बक्षिसी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पीएमपीच्या कायम आणि बदली सेवकांना बोनस देण्याची मागणी पीएमटी कामगार संघ (इंटक) आणि पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने पीएमपी प्रशासनाकडे केली आहे.
इंटक ने म्हटले आहे कि पीएमपीला पुणे आणि पिंपरी महापालिकेकडून अनुदान दिले जाते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बोनस देणे गरजेचे आहे. दोन मनपा कडून निधी मिळून प्रशासनाने वेतन आयोगा बाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे पीएमपी फक्त ठेकेदाराचे हित पाहते, असा आरोप इंटक ने केला आहे. बोनस नाही दिला गेला तर कर्मचाऱ्यांच्या भावनांचा विस्फोट होईल आणि त्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची राहिल, असा इशारा इंटक ने दिला आहे.
पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ने म्हटले आहे कि, पीएमपी कर्मचाऱ्यांना ८.३३% सानुग्रह अनुदान आणि १९००० ची बक्षिसी आणि ३००० चा कोविड भत्ता देण्यात यावा. कारण पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी कोरोन काळात दोन्ही मनपाकडे खूप काम केले आहे.