Deccan Gymkhana Chitale Corner Pune | डेक्कन जिमखान्या जवळील चितळे कॉर्नरचा वाढदिवस | नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने!

HomeBreaking Newsपुणे

Deccan Gymkhana Chitale Corner Pune | डेक्कन जिमखान्या जवळील चितळे कॉर्नरचा वाढदिवस | नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने!

कारभारी वृत्तसेवा Jan 01, 2024 2:27 PM

PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!
PMC 32 Villages property tax | ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा | मात्र महापालिकेला हक्काच्या उत्पन्नावर सोडावे लागणार पाणी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
PMC Employees Union | पीएमसी एम्प्लॉईज युनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न! | कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचे उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन 

Deccan Gymkhana Chitale Corner Pune | डेक्कन जिमखान्या जवळील चितळे कॉर्नरचा वाढदिवस | नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने!

 

Deccan Gymkhana Chitale Corner Pune | डेक्कन जिमखाना परिसर समिती (Deccan Gymkhana Parisar Samiti) तर्फे एका वेगळ्याच कारणासाठी आजची सकाळ साजरी करण्यात आली. दहा वर्षे झाल्यावर अनेक जण विविध कारणांसाठी वाढदिवस साजरे करतात. डेक्कन जिमखान्यावरील चितळे कॉर्नर येथे कचऱ्याचे दोन कंटेनर होते, ते भरून रस्त्यावर वहात असत. ते काढून टाकून आज बरोबर दहा वर्षे झाली. तेव्हा पासून ही जागा स्वच्छ राहते. त्यानिमित्ताने डेक्कन जिमखाना परिसर समितीने हा एक आगळावेगळा वाढदिवस आयोजित केला होता. (Pune News)

कंटेनर मुक्त परिसर करण्यासाठी बऱ्याच जणांचे योगदान होते. महानगरपालिका अधिकाऱ्यांपासून, नगरसेवक, पालिकेचे कर्मचारी, जनवाणी आणि स्वच्छ संस्थेचे कर्मचारी, आणि परिसरातील नागरिक सगळ्यांचा सहभाग यामध्ये होता. ह्या कार्यक्रमासाठी त्यावेळचे घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहआयुक्त सध्याचे उपायुक्त (अतिक्रमण, पर्यावरण इ.) माधव जगताप,  निरीक्षक इनामदार, इतर घनकचरा अधिकारी  रूपाली जाधव,  मांडेकर व इतर सर्व निरीक्षक आणि मुकादम येनपुरे,  खंडू कसबे, प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे व माजी नगरसेवक  अनिल राणे आदींची विशेष उपस्थिती होती.

दहा वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्यासाठी परिसर समितीतील सर्वांनीच अतिशय प्रयत्न केले डॉ. सुमिता काळे, डॉ. सुषमा दाते, प्रिया भिडे, माधवी राहिरकर, स्वाती पेडणेकर, नीलिमा रानडे इत्यादी सर्व जणींनी घरोघरी जाऊन कचरा वेगळा करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच संपूर्ण डेक्कन जिमखान्यावर स्वच्छ या संस्थेच्या मदतीने घरोघरी घंटागाडी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी एक पद्धत चालू केली. त्यामुळे कंटेनर मध्ये येणारा या परिसरातील कचरा तीन-चार महिन्याच्या सातत्याच्या प्रयत्नाने थांबला. कंटेनर काढल्यामुळे रस्त्यावर मोठी मोकळी जागा तर मिळालीच त्याबरोबर त्या परिसरातील दुर्गंधी नाहीशी झाली. लोकांना याचा भरपूर फायदा झाला हेच उदाहरण घेऊन संपूर्ण प्रभागातील ३६ कंटेनर काढून टाकण्यात आले.

याप्रसंगी, महानगरपालिकेचे उपायुक्त जगताप यांनी सर्वांना आवाहन केले की, “दरवर्षी संकल्प करून आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन, असेच लोकांच्या उपयोगाचे कार्यक्रम सातत्याने चालू राहावेत.” त्यांनी परिसर समितीचे आणि सगळ्या महानगरपालिकेच्या टीमचे अभिनंदन केले. श्रीमती माधुरीताई सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमाच्या वेळी म्हणाल्या की, “सर्वांच्या सहकाराने आपण अत्यंत कठीण काम यशस्वीपणे करून, गेली दहा वर्षे हा कोपरा कंटेनर मुक्त ठेवला आहे.” मुकादम श्री. येनपुरे व त्यांच्या सर्व टीमसाठी डेक्कन जिमखाना परिसर समितीतर्फे विशेष आभार व्यक्त केले. सर्व उपस्थित कर्मचारी, सहकारी यांना गुलाबाचे फुल व पेढा देऊन त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. हा कोपरा आता कधीकधी म्हणावा तसा स्वच्छ नसतो, हे लक्षात घेऊन सर्वांनी एकत्र येऊन परत एकदा स्वच्छतेबद्दल प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.