प्रभाग रचनेवर नगरसेवक नाराज; नोंदवल्या हरकती
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभाग रचना(Ward Structure) समाधानकारक नसल्याने हरकती नोंदविण्यासाठी नगरसेवकच(Corporators) सरसावले आहेत. यामध्ये महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या हरकती व सूचना नोंदवून सोईनुसार प्रभाग व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे.(Pune Corporation Election Updates)
पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. प्रभाग रचना सोईची व्हावी यासाठी महापालिका आयुक्तांच्या घरी जाण्यापासून ते मुंबईत जाऊन मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या भेटी नगरसेवकांनी, इच्छुकांनी घेतल्या होत्या. निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर त्यात मोठ्याप्रमाणात बदल झाले आहे. नगरसेवकांचा हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.काँग्रेसने तर प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, प्रत्येक प्रभागांचे नियोजन केले आहे. भाजपने या प्रारूप रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता, प्रत्यक्षात याचिका दाखल झालेली नसली तरी भाजपच्या नगरसेवकांनीही मोठ्याप्रमाणात हरकती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे कोथरूडमधील प्रभाग भाजपसाठी सुरक्षीत असले तरीही हरकती घेतल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३३ मध्ये बावधनचा भाग तोडून त्याऐवजी गांधी भवनचा भाग जोडावा, फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणे या प्रभाग क्रमांक १६ मधील मातोश्री वृद्धाश्रमाच्या मागील गल्लांचा भाग वगळावा, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोरे विहार सोसायटीची चुकीच्या पद्धतीने विभागणी झाली आहे त्यात बदल करावा, प्रभाग क्रमांक ३२ मधील भुसारी कॉलनीला सुतारदराचा भाग जोडला आहे, त्यामुळे हा भाग वगळून, सोसाट्याचा परिसर जास्त असावा अशा पद्धतीने स्थानिक विद्यमान नगरसेवकांनी हरकती घेतल्या आहेत.
याचपद्धतीने भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नगरसेवकांनी इच्छुकांनी पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला मतदारघातील प्रभागात हरकती सूचना घेतल्या आहेत. तर काही जणांनी शेवटच्या दिवशी हरकती नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे. अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा, गल्ल्यांऐवजी मुख्यरस्त्यांवरून प्रभागाची सीमा निश्चीत करावी, एक सोसायटी दोन प्रभागात विभागू नये यासह इतर हरकती घेतल्या आहेत.७९२ हरकती सूचनाशनिवारी (ता. १२) महापालिकेकडे १६० हरकती-सूचना आलेल्या आहेत. १ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या दरम्यान ७९२ हरकती व सूचना आलेल्या आहेत. रविवारी महापालिकेचे सर्व कार्यालय बंद राहणार असल्याने हरकती नोंदविता येणार नाहीत. सोमवारी (ता. १४) शेवटच्या दिवशी दुपारी तीन पर्यंत हरकती-सूचनांसाठी मुदत आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
COMMENTS