फेरीवाल्यांना दिलासा : जुन्या नियमाप्रमाणेच भाडे आकारणार
: स्थायी समितीची मान्यता
पुणे : शहरातील फेरीवाल्याना स्थायी समितीने चांगलाच दिलासा दिला आहे. नवीन दरवाढीमुळे फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले होते. यातून फेरीवाल्यांची सुटका होणार आहे. सर्व फेरीवाल्यांचे भाडे आता जुन्या नियमाप्रमाणेच आकारले जाणार आहे. म्हणजे या लोकांना आता दिवसाला 100 रुपये न दयावे लागता वर्षाला 240 रुपये द्यावे लागणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि माजी सभागृह नेता धीरज घाटे यांनी या बाबतच्या प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अशी माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
: धीरज घाटे यांचा प्रस्ताव
महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरात फेरीवाला धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने फेरीवाल्यांच्या परवाना शुल्कात देखील वाढ केली आहे. पूर्वी फेरीवाल्यांकडून वर्षाला सरसकट 240 रुपये आकारले जात होते. मात्र नवीन नियमानुसार हे भाडे दिवसाला 100 रुपयांपर्यंत गेले आहे. त्यातच कोरोनाचा कहर गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे शुल्क जुन्या नियमानुसार करावे, असा प्रस्ताव धीरज घाटे यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावानुसार पुणे मनपाचे नव्याने दरभाडे आकारण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या दैनंदिन उत्पन्नापेक्षा हे भाडे अधिक आहे. त्यामुळे स्थिर हातगाड्या व बैठे परवाना धारकांना जुन्या नियमाप्रमाणे भाडे आकारण्यात यावे. या प्रस्तावाला मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता या लोकांना आता दिवसाला 100 रुपये न दयावे लागता वर्षाला 240 रुपये द्यावे लागणार आहेत. फेरीवाल्याना हा दिलासा मानला जात आहे.
—–
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. यामुळे पथारी वाल्यांची आर्थिक स्थिती खूप नाजूक झाली आहे. त्यातच महापालिकेचे भाडे देखील त्यांच्या दररोजच्या उत्पन्नापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे हे भाडे कमी करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. या अगोदर देखील जून 2019 मध्ये प्रशासनाला प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्य सभेत देखील आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ आणि त्याची अंमलबजावणी करू.
COMMENTS