महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभे करण्याचे काँग्रेसचे नियोजन
| स्वबळाचा नारा देत अरविंद शिंदेनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जागवली ऊर्जा
पुणे | आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यानुसार काँग्रेस येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभा करणार आहे. तसे नियोजन देखील पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी 6 महिने पक्षासाठी सर्वस्व अर्पण करत मेहनत करा, अशी अपेक्षा अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली आहे.
https://youtu.be/gdamQK9ampw
| काँग्रेस ने घेतली आघाडी
राज्यातील राजकीय घडामोडी कडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यामुळे महापालिका निवडणुकीचा विषय मागेच पडला होता. सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा निवडणुकीचा विषय ऐरणीवर आला आहे. कारण महाविकास आघाडी सरकार कोसळून आता भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरु करण्यात काँग्रेस ने आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस ने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. तसेच प्रभारी अध्यक्ष झाल्यानंतर देखील अरविंद शिंदे यांना कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या होत्या. त्यामुळे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शिंदे यांनी बैठक घेतली. यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेण्यात आल्या.
| पक्षासाठी आगामी 6 महिने सर्वस्व अर्पण करा
महापालिका निवडणुकीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त केल्या कि आता महाविकास आघाडी सरकार नाही, त्यामुळे आपल्याला चांगला जोर लावावा लागणार आहे. तसेच मतदार याद्याबाबत देखील तक्रारी सांगितल्या. पदाधिकाऱ्यांनी देखील निवडणुकीच्या नियोजनाबाबत सूचना केल्या. त्यावर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि आपण येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 173 जागांवर उमेदवार उभा करणार आहोत. तसे नियोजन देखील पक्षाकडून सुरु आहे. त्यामुळे आगामी 6 महिने पक्षासाठी सर्वस्व अर्पण करत मेहनत करा, अशी अपेक्षा अरविंद शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान शिंदे यांनी पदावर आल्यानंतर आजी माजी लोकांना एकत्र करत सुसंवाद साधल्याने आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत. शिवाय महापालिका निवडणूक स्वबळावर लढवायची असल्याने देखील कार्यकर्ते खुश आहेत. कारण या अगोदर नेहमी आघाडी होत असल्याने काही जागांवर पाणी सोडावे लागत होते. मात्र आता संधी मिळण्याची आशा असल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच समाधानी झाले आहेत.