कॉंग्रेस चे नगरसेवक पिशव्या, बकेट, बाकडी खरेदी नाही करणार
: नगरसेवकांना सूचना करणार : रमेश बागवे
पुणे : महापालिकेच्या खर्चातून कचऱ्यासाठीच्या पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष वीरेंद्र किराड व संजय बालगुडे यांनी दिला आहे. तसेच आमच्या नगरसेवकांना देखील ही खरेदी न करण्याची सूचना केली जाईल. असे अध्यक्ष बागवे यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन त्यात बकेट, पिशव्या आणि ढकलगाडी यांचा वापर नगरसेवक प्रचारासाठी करतील असे नमुद करण्यात आले आहे. याकरिता, या वस्तूंची खरेदी तूर्त थांबवावी. निवडणुकीनंतर महापालिकेच्या अंदाजपत्रकात रितसर तरतूद करुन या वस्तूंची खरेदी केली जावी आणि मार्च महिन्यात त्यांचे वाटप करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.
वस्तू खरेदी करुन त्यावर नगरसेवक आपापली नावे लिहून त्या वस्तूंचे वाटप करतात हा प्रचाराचाच एक भाग होईल. अवघ्या चार महिन्यांत निवडणुका होणार असल्याने नागरिकांकडून कररुपाने मिळालेल्या पैशातून सुमारे १६ कोटी रुपयांची उधळपट्टी होईल हे गैर आहे. आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अनागोंदी आळा घालावा. शिवाय, बदललेल्या प्रभाग रचना लक्षात घेऊन वस्तुंचे वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातूनही गोंधळ उडेल, नगरसेवकांसाठी असलेल्या निधीतून ढकलगाडी खरेदी करण्यास सक्त विरोध राहील. ढकला गाड्यांवरही नगरसेवकांची नावे लिहून प्रचार साधला जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे.
आयुक्तांनी विशेष अधिकार वापरुन ही खरेदी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
पिशव्या, बकेट, बाकडी, ढकलगाड्या खरेदी करण्याचा निर्णय झाला असून, हा निर्णय म्हणजे नगरसेवकांच्या निवडणूक प्रचारासाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याने या वस्तूंची खरेदी आयुक्तांनी थांबवावी. आम्ही आमच्या नगरसेवकांना देखील ही खरेदी न करण्याच्या सूचना करणार आहोत.
COMMENTS