बिल्डर आणि मॉल धारकांना प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक
: महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : महाराष्ट्र जल नियामक मंडळाकडून सातत्याने दिल्या जात असलेल्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिकेने मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी वापरणे बंधनकारक करण्याकरिता आदेश कालपासून लागू केले आहे. त्यानुसार पुणे शहरातील सर्व बांधकामे तसेच बॅच मिक्स प्लांट येथे सर्व संबंधित व्यावसायिकांनी नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या अथवा खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरायचे आहे. तसेच मॉलधारकांना कुलिंग टॉवर साठी देखील प्रक्रिया केलेले पाणीच वापरावे लागणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश नुकतेच जारी केले आहेत.
: असे आहेत आदेश
पुणे महानगरपालिकेच्या मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी बांधकामासाठी व बॅच मिक्ससाठी आय एस ३०२५ व आय एस ४५६ या अभियांत्रिकी मानकानुसार योग्य असल्याची खातरजमा करण्यात आलेली आहे. खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वरील मानकानुसार बांधकामासाठी योग्य असल्याचे संबंधित व्यावसायिकाने तपासून घ्यावे. कोणत्याही परिस्थितीत बांधकामे व बांधकाम पूरक व्यवसायात पिण्याचे पाणी व भूगर्भातील पाण्याचा उपसा करून पाणी वापरावयाचे नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच पुणे शहरात असलेल्या अनेक मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कुलिंग टोवर्स वापरली जातात त्यासाठी सुद्धा सर्व मॉल धारकांनी पुणे महानगरपालिकेच्या नजीकच्या मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणीच वापरायचे आहे. तरी सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅच मिक्स प्लांट येथे सर्व संबंधित व्यावसयिक व सर्व मॉल-धारक नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या/ खाजगी मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरत आहेत अगर कसे याची पाहणी करून त्याचा पाक्षिक अहवाल प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आमचेकडे सादर करावा. तसेच बांधकाम विकास विभागातील अभियंत्यांनी त्यांच्या भागातील विकास कामांवर नजीकच्या पुणे महानगरपालिकेच्या/खाजगी मैलाजलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात आहे अगर कसे याची पाहणी करून त्याचा पाक्षिक अहवाल आमचेकडे सादर करावा, ज्या खाजगी मैलापाणीशुद्धीकरण केंद्रातील पाण्याचा बांधकामासाठी पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्या संबंधित सोसायटीला प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नमुने आय एस ३०२५ व आय एस ४५६ या अभियांत्रिकी मानकानुसार दर चार महिन्यांनी तपासून घेण्यास सांगून त्याचा अहवाल
मलनिस्सारण देखभाल दुरुस्ती विभागाने सादर करावा. खाजगी मिळकती मधील अकार्यक्षम मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांचे सर्वेक्षण करून ते कार्यान्वित करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प विभागाने कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करावा. या कार्यालयीन परिपत्रकानुसार लोकांमध्ये याबाबत जागृती करण्यात यावी व तसेच त्यांना मार्गदर्शन व आवश्यक त्या सुचना सातत्याने देण्यात याव्यात. असे आदेशात म्हटले आहे.
COMMENTS