उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्काच आहे.
शिवेसेनेत (Shiv Sena) बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले.
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली. यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.
सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे. काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.