BARTI | Pune | बार्टी मार्फत मिळणार रोजगार व स्वयंरोजगाराचे नि:शुल्क प्रशिक्षण
BARTI | Pune | डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील (SC) उमेदवारांना रोजगाराचे व स्वयंरोजगाराचे नि:शुल्क प्रशिक्षण दिले जात असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जातीतील २५ हजार उमेदवारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनिल वारे (Barti Director General Sunil Vare) यांनी दिली आहे. (BARTI Pune)
विज्ञान तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल लक्षात घेता प्रगत, प्रशिक्षित, मनुष्यबळाला मोठी मागणी निर्माण होणार आहे, हे लक्षात घेऊन बार्टीने रोजगार, स्वयंरोजगार तसेच परदेशामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बार्टी मार्फत पहिल्या टप्यामध्ये ५ हजार उमेदवारांना टाटा स्ट्राईव्ह, लर्नेट स्किल लि., आयसीआयसीआय, स्किल ॲकॅडमी तसेच राष्ट्रीय सुगी पश्चात काढणी तंत्रज्ञान संस्था, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, खादी व ग्रामोद्योग मंडळ, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था, व राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान संस्था या शासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. (BARTI Pune News)
तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल आत्मसात करण्यासाठी विविध कौशल्य असणारे मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी बार्टीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू आहे. मागील वर्षी ३ हजार १८० उमेदवारांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यात आले आहे.
अनुसूचित जातीतील युवक-युवती आणि महिलांना विकासाची दिशा दाखविणारे समुपदेशन, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, परेदशी भाषा प्रशिक्षण, नोकरी व स्वयंरोजगारासाठी लागणारे कौशल्याचे प्रशिक्षण बार्टीमार्फत दिले जाते. लक्षित गटातील शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती उंचविण्यासाठी धोरणात्मक कार्यवाही आदी कामे बार्टीच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
परदेशात रोजगाराची संधी मिळविण्यासाठी बार्टी मार्फत ओव्हरसीज प्लेसमेंट प्रोग्रामची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील ५०० उमेदवारांना बहरीन,कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया,आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही बार्टीचे महासंचालक श्री. वारे यांनी केले आहे.
—-
News Title |BARTI | Pune | Free training for employment and self-employment will be provided through Barti