७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करा
: मानवी साखळीद्वारे PMPML कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेस घेराव
: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नेतृत्व
पुणे : पुणे महानगरपालिकेला मानवी साखळीद्वारे घेराव घालण्यात आला. PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून आंदोलन करण्यात आले.
याबाबत प्रशांत जगताप यांनी सांगितले कि महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून PMPML कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय करण्याचं धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. वर्षानुवर्षे पुणेकरांची सेवा करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची पदोन्नती सत्ताधारी भाजपने केली नाही. सभागृहात चर्चा करूनही PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करणे याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. संपूर्ण शहर कोरोनाच्या संकटाशी लढा देत असताना PMPML कामगारांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली मात्र या कोरोना काळातील सेवेचे वेतनही महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले नाही. यावर कळस म्हणजे PMPML च्या खासगीकरणाची चाचपणी सुरू केली. पुणे शहराच्या विकासात PMPML कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे असतानाही कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. कोरोनाच्या काळात बसेस बंद असतानाही ठेकेदारांना तब्बल १६० कोटी रुपये देणारे सत्ताधारी भाजप कर्मचाऱ्यांच्या वेतानाच्यावेळी मात्र हात आखडता घेतात. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी द्वारे संपूर्ण महापालिकेस घेराव घातला होता. एक खासदार, सहा आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, PMPML वरील संचालक भाजपचे असतानाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय याचा अर्थ भाजपला कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही, त्यांना फक्त ठेकेदाराचे कल्याण करायचे आहे. असे यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष व सभागृहातील सदस्य या नात्याने प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला की येत्या ७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या या अक्रोशाने भाजप नेत्यांचे रस्त्यावर फिरणेही अशक्य होईल. यासोबतच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यास पहिल्याच बैठकीत PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अश्वासन त्यांनी कामगार बांधवांना दिले.
महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,विरोधी पक्षनेता दिपाली धुमाळ, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, .रवींद्रआण्णा माळवदकर, प्रदीप देशमुख,सोमनाथ शिंदे,किरण थेऊरकर,सुनील नलावडे,राजेंद्र कोंडे,हरीश ओहोळ,कैलास पासलकर आदींसह PMPML युनियन चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS