गारपीट, अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे तात्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन
पुणे : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी विमासंरक्षीत पिकाच्या गारपीट, अवेळी पाऊस आदी नैसर्गिक कारणाने झालेल्या नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह आपल्या संबंधित विमा कंपनीकडे सादर करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.
हवामानशास्त्र विभागाने राज्यात 7 ते 9 मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे अशा घटना घडून विमासंरक्षित पिकांचे नुकसान झाले असल्यास अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी त्याची माहिती 72 तासांच्या विहित कालमर्यादेत संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आदी घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या स्वरुपानुसार विहित रक्कम शेतकऱ्यांना देय असते. सध्या रब्बी हंगाम सुरू असून यामधील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा पिकांना विम्याचे संरक्षण घेतले असल्यास आणि नुकसान झाले असल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकेल.
नुकसानीबाबतची माहिती शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायांचा वापर करता येईल, असेही आयुक्तालयाने कळवले आहे.
COMMENTS