यशवंतराव चव्हाण सेंटरच्या दुसऱ्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याची घोषणा
|विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींना नाव नोंदणी करण्याचे खासदार सुळे यांचे आवाहन
पुणे | यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या वर्षीही दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून गेल्या वर्षी बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता. चालू वर्षीच्या सोहळ्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली असून राज्यभरातील विवाहेच्छूक दिव्यांग तरुण तरुणींनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
विवाहेच्छुक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इच्छुक दिव्यांगांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी असा सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. गत वर्षी पहिला असा विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पूर्व नोंदणी आणि वधू-वर सूचक मेळावा घेण्यात आला. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला; आणि त्या मेळाव्यातून बारा जोडप्यांचे विवाह जमले.
विवाह जमलेल्या दिव्यांग जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा चव्हाण सेंटरच्या वतीने पुण्यात घेण्यात आला. राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित रहात दिव्यांगांसाठी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले. ही खरे तर त्या सोहळ्याची सर्वात मोठी उपलब्धी ठरत तो विवाह सोहळा म्हणजे मैलाचा दगड ठरला, असे खासदार सुळे यांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो, असे त्या म्हणाल्या.
चालू वर्षीच्या सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्यासाठी वधु- वरांची पूर्व नाव नोंदणी येत्या ३० डिसेंबर पर्यंत करता येणार आहे. त्यासाठी ८६५२११८९४९ किंवा ८१६९४९३१६१ या नंबरवर संपर्क साधून तसेच https://www.chavancentre.org/announcement/registration-of-names-for-community-disabled-marriage-ceremony-started या चव्हाण सेंटरच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करता येईल, असे सुळे यांनी स्पष्ट केले. नोंदणी सुरू झाली असून राज्यातील विविध भागातून दिव्यांग तरुण-तरुणी नोंदणी करत आहेत. गतवर्षी सांगितल्याप्रमाणे हा सोहळा आणखी मोठ्या प्रमाणावर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी जास्तीत जास्त विवाहेच्छूक तरुण-तरुणींनी या विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.