Anantrao Pawar College Pune | अनंतराव पवार महाविद्यालयात पालक आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न
Pune News – (The Karbhari News service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयात (पिरंगुट) पालक आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात महाविद्यालयाइतकेच पालकही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तसेच महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेले माजी विद्यार्थी हे समाजघडणीत महत्त्वाचे योगदान देत असतात. एकूणच, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक आणि माजी विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग सहाय्यभूत ठरतो. त्यादृष्टीने पालक आणि माजी विद्यार्थी यांच्यात सुसंवाद घडून येण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात पालक आणि माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
स्नेहमेळाव्याचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. शांतारामदादा इंगवले (माजी जिल्हा परिषद गटनेते, पुणे), मा. मोहन गोळे (माजी सरपंच, पिरंगुट), मा. सुरज पवळे (माजी विद्यार्थी प्रतिनिधी), मा. दीपक आवळे ( सामाजिक कार्यकर्ते) लाभले होते. याप्रसंगी मा. रामदास गोळे (माजी उपसरपंच, पिरंगुट), मा. प्रतीक्षा आवळे (माजी उपसरपंच, पिरंगुट), मा. गणेश मारणे (माजी उपसरपंच, भोडे), मा. समीर मारणे, मा. दिनेश उभे, मा. राकेश कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. भरत कानगुडे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयातील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची माहिती दिली. तसेच नवे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ याविषयीची माहिती, ‘शिक्षण ४.०’ द्वारे आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची जागरुकता, आणि कौशल्यआधारित नव्या उच्च शिक्षणात पालकांची बदलती भूमिका यांविषयी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मा. शांतारामदादा इंगवले यांनी महाविद्यालयाशी आपले जुने ऋणानुबंध आहेत. पुढील काळातही आपले सर्व सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आपण आपल्या ३५ वर्षांच्या समाजकारणात आणि राजकारणात सामंजस्याने काम करण्यावर भर दिला. सामंजस्यामुळे काम करणे शक्य होते. त्यानुसार महाविद्यालयात विद्यार्थी हिताचे चांगले काम सुरू आहे. यापुढेही मा. प्राचार्यांनी पालक, ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने महाविद्यालयात नवनवे उपक्रम राबवावेत, त्यास आपले आवश्यक ते सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. मा. मोहन गोळे यांनी हे महाविद्यालय मुळशी तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यादृष्टीने आपण महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहोत, हे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आर्थिक सांगड साधून यशस्वी जीवन जगावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. दीपक आवळे आणि मा. सुरज पवळे या पाहुण्यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी सदैव मदतीस तत्पर असल्याचे स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांनी पालक आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले. आणि हा स्नेहभाव पुढील काळात अजून वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा प्रकट केली. महाविद्यालयाची आपली सर्व टीम ही विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करत आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते, हे सांगून पालकांना आश्वस्त केले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देता याव्यात; यासाठी शिक्षण आणि शिक्षणपूरक उपक्रम राबवण्यावर विशेष लक्ष दिले जाते, हेही स्पष्ट केले. माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण असून पुढील काळात अधिकाधिक माजी विद्यार्थ्यांना संपर्क साधून महाविद्यालयाशी जोडून घेतले जाईल, हे अधोरेखित केले.
प्राचार्यांनी विद्यार्थीहिताची कामे करताना महाविद्यालयास संस्थेचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. ॲड संदीप कदम, सहसचिव (प्रशासन), मा. ए. एम. जाधव, उपसचिव मा. एल. एम. पवार, खजिनदार मा. ॲड मोहनराव देशमुख या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभते, हेही आवर्जून नमूद केले.
पालक व माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून मा. पूनम कोडग यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थी मयुरी शिंदे, रोहिणी सुतार, दिनेश सोळंकी, ओमकार गोळे, शंकर मरगळे, सुरज पवळे या विद्यार्थ्यांनीही महाविद्यालय व शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केले. आणि महाविद्यालयास आवश्यक ती मदत करण्याची तयारीही दर्शवली. तसेच यावेळी २०११ च्या बॅचने आपले त्या वेळचे शिक्षक आणि महाविद्यालयाचे आताचे प्राचार्य डॉ. बी. जी. लोबो यांचा सत्कार करून कृतज्ञताभाव व्यक्त केला.
स्नेहमेळाव्यास पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत देशमुख आणि डॉ. मनीषा खैरे यांनी केले. तसेच माजी विद्यार्थी व पालक समिती समन्वयक व संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. हेमंत उबाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. महेश कांबळे, डॉ. रसाळे, डॉ. स्मिता लोकरे, डॉ. गणेश चौधरी , प्रा. पूनम माझिरे, प्रा. दीप सातव, डॉ किसन पालके, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. दत्तात्रय फटांगडे, प्रा. श्रुती निकटे, दीपाली पवळे, श्री. अनिल डोळस, श्री. निलेश ठोंबरे, श्री. विशाल मोकाटे, श्री. मंगेश गोळे, श्री. विजय साखरे , श्री. दत्ता चौधरी, श्री. हेमंत वाईकर, श्री. पासलकर, श्री. मोहन कोकरे इ. महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक समिती सदस्य, तसेच इतर सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पालक आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा महाविद्यालय-पालक- आजी-माजी विद्यार्थी यांच्यात सुसंवाद घडून येण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा ठरला.
COMMENTS