Ajit Pawar | पाईट-खेड अपघात | मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार
Khed Accident – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील पाईट (ता. खेड) येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करत, या कठीण प्रसंगात शासन त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. (Pune News)
आपल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्य शासन या संकटाच्या काळात अपघातग्रस्त नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार दिली आहे.

COMMENTS