Ajit Pawar on Pune Traffic | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा  | उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

HomeBreaking News

Ajit Pawar on Pune Traffic | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा | उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

Ganesh Kumar Mule Aug 08, 2025 8:45 PM

Baramati | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहित निम्मे मंत्रिमंडळ २ मार्चला बारामतीत राहणार उपस्थित  
100th Natya Sammelan | १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
Ajit Pawar | Diwali Padwa With Pawar Family | दिवाळी पाडव्याला अजित पवार नागरिकांना भेटणार नाहीत

Ajit Pawar on Pune Traffic | वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा

| उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

 

Pune News – (The Karbhari News Service) – वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. (Ajit Pawar)

या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चाकण एमआयडीसीसह परिसरातील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे व्यवसायिक, कामगार, वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. या भागात अतिक्रमणधारकांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत तातडीने अरुंद असलेले रस्ते रुंद करण्यासाठी तातडीने पावणे उचलणे अपेक्षित आहे. अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी जर रस्ते विकसित झाले नाही तर पुन्हा अतिक्रमण वाढते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयातून अतिक्रमण काढल्यानंतर तातडीने रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.

चाकणसह परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अशा वाहनांवर ठराविक वेळेची बंधने घालत एमआयडीसी भागात ट्रॅक टर्मिनल सुरू करण्यावर भर देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आरटीओ यांच्यासह पोलीस यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करणे अपेक्षित आहे. यासह कचऱ्याची समस्या निकाली काढत या भागातील अतिक्रमणे तातडीने काढावी. रस्ते विकसित करताना जर कोणी चुकीची भूमिका घेत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल, यासंदर्भात उपाययोजनांची माहिती, त्याचे कालबद्ध टप्पे व मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले.
*
उपाययोजनांची कामे समाधानकारक
गेल्या महिन्याभरापासून हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या निराकरणासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा विविध उपायोजनांवर भर देत आहे. आजपर्यंत झालेली कामे समाधानकारक असल्याने ती नागरिकांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे उर्वरित कामे याच गतीने पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. चाकण भागात पण प्रशासकीय यंत्रणा अशाच पद्धतीने उपायोजनांवर भर देणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
*
चाकणसह एमआयडीसी भागात पाहणी
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणसह एमआयडीसी भागातील नागरी समस्या व वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पाहणी केली. यादरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. यात त्यांनी भारत माता चौक मोशी, समृद्धी पेट्रोल पंप सॅनी कंपनी नाणेकरवाडी, बंगला वस्ती मेदनकरवाडी – सासे फाटा, चाकण चौक, आंबेठाण चौक, चाकण चौक ते कडचीवाडी, हिंगणे चौक खराबवाडी, म्हाळुंगे पोलीस चौकी एमआयडीसी रस्ता आदी भागात पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.