अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती
– 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात
– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला अखेर गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात अर्ध्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले होते. महापालिकेच्या पथ विभागातर्फे सध्या उर्वरीत रस्त्याच्या 60 लाख रुपयांच्या कामाची सुरूवात झाली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
या कामाचे उद्धाटन भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदिश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआय आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य अध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, सचिन धीवार, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, माजी नगरसेविका फरजाना शेख प्रभाग दोन मधील विविध धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, आरपीआय आठवले गट, भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक, सामाजिक मंडळांचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, अग्रेसन शाळा ते ई-कॉमरझोनचा रस्ता पुर्ण झाल्यास वाहनधारकांची होणारी मोठी गैरसोय टळणार आहे. वाहनधारकांना मारावा लागणारा मोठा वळसा कमी होणार असून अंतर आणि वेळ वाचणार आहे. मधल्या काळात कोविडच्या महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची संपलेली मुदत यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हा रस्ता पुर्ण करून नागरिक, नोकरदार, कामगार, वाहनधारकांची गैरसोय दुर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.
विश्रांतवाडी चौक सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी पुणे महापालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी महापालिकेकडे निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे या वेळी केली.
कॉमरझोन चौकातील वाहतूक कोंडी सुटणार –
प्रभाग दोन मधील कॉमरेझोन चौकात नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केल्याने विद्युत पथदिवे (सिग्नल) बसविन्यात आले आहेत. तसेच डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने चौक सुशोभीकरणाचा आराखडा (डिझाईन) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे चौक आकर्षित होऊन वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होणार आहे.