Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!
| लोकसभेसाठी नवीन चेहरा शिवाय ओबीसी कार्ड चा देखील होणार विचार
Aba Bagul Pune Loksabha – (The Karbhari News Service) पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Election) भाजप अर्थात महायुती कडून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी कडून ज्येष्ठ नेते आबा बागुल (Aba Bagul Congress) यांचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडी कडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता बागूल हेच यासाठी पात्र ठरत आहेत. येत्या 18 मार्च ला हे नाव अंतिम केले जाईल. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Pune Loksabha Constituency)
पुणे लोकसभा निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. कारण भाजप कडून आपले पत्ते ओपन करण्यात आले असून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून योगेश मुळीक, सुनील देवधर यांची देखील नावे शर्यतीत होती. मात्र मोहोळ यांची लोकप्रियता आणि मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण उमेदवार राज्यसभेसाठी देण्यात आला असल्याने, मराठा उमेदवार म्हणून मोहोळ यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. आपला उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडी सावध पाऊल टाकत आहे. परंपरे प्रमाणे आघाडी कडून ही जागा काँग्रेस ला सोडण्यात येईल. त्यानुसार काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही जातीची समीकरणे निश्चित करूनच उमेदवार अंतिम करणार आहे.
लोकसभेसाठी काँग्रेस कडून शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते आबा बागुल आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. दिल्लीत या तीन नावावर चर्चा सुरु आहे. यातील अरविंद शिंदे हे मराठा उमेदवार आहेत. जातीची समीकरणे जोडायची झाली तर शिंदे यांचे नाव मागे पडून ओबीसी चेहरा पुढे केला जाऊ शकतो, असे मानण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडे सद्यस्थितीत पद देखील आहे. ओबीसी चेहरा असलेले बागुल आणि धंगेकर हे उरतात. काँग्रेसच्या एक नेता एक पद या नियमानुसार धंगेकर यांना आमदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आणि ओबीसी चेहरा म्हणून बागूल हेच पात्र ठरतात, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले आहे.
शिवाय आमदार धंगेकर यांना उमेदवारी मिळाली भाजप आपली दुप्पट ताकद लावणार आहे. त्याला कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात धंगेकर यांनी बाजी मारली होती. तो पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. धंगेकर उमेदवार असतील तर भाजप त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काँग्रेस सावध पाऊले टाकत आहे.
बागूल हे पहिल्यापासूनच सॉफ्ट आणि काँग्रेसचा सभ्य चेहरा म्हणून ओळखले जातात. शिवाय महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांचेच नाव लावून धरत आहेत. बागूल यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेस ला पुणे लोकसभेची जागा हमखास मिळू शकेल, असे काँग्रेस वरिष्ठाना देखील वाटते. त्यामुळे येत्या काही दिवसांत बागूल यांचे नाव जाहीर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.