Aarogya Wari | राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Homeadministrative

Aarogya Wari | राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Ganesh Kumar Mule Jun 19, 2025 5:47 PM

MLA Sunil Kamble’s work report : Chandrakant Patil : आमदार सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा मजबूत बालेकिल्ला
Chandrakant Patil : हिंमत असेल तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदानाने घ्या : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान
Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना पुस्तकांच्या खरेदीवर १०० रुपये सवलत|  सोसायटीमध्ये वाचनालयासाठी १००० रुपयांची सवलत

Aarogya Wari | राज्य महिला आयोगाच्या ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

महिला आयोगाने महिला वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत घेतलेला पुढाकार स्तुत्य- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

Palkhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) –  राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येत असून राज्य महिला आयोगानेही वारीदरम्यान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीतील अडचणीला लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रे, नष्टीकरणासाठी इन्सीनरेशन यंत्रे आदी उपलब्ध करुन देण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. (Chandrakant Patil)

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन निवडुंगा विठोबा मंदिर येथे करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, सुनील बल्लाळ, माजी नगरसेवक विशाल धनवडे आदी उपस्थित होते.

वारीसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान दिले आहे. पंढरपूर येथे दर्शनबारी उभी करण्यासाठी ७३ कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे. या बारीत एकाच वेळेस ६ हजार लोक या दर्शनबारीत असतील तसेच या इमारतीमध्ये बारीमध्ये असताना बाकडे, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची आदी सुविधा उपलब्ध असतील. पूर्वी पालखीच्या मार्गावर शौचालयांची सुविधा खूप कमी असल्याने अस्वच्छता होत असे. मात्र मोठ्या प्रमाणात फिरत्या स्वच्छतागृहांची मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था केली आहे.

शहरात सॅनिटरी नॅपकीन विक्रीसाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी पुढाकार घ्यावा
आयोगाने सॅनिटरी नॅपकीन पुरवण्यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे. एक रुपयाला एक सॅनिटरी पॅड याप्रमाणे १० उत्कृष्ट गुणवत्तेच्या पॅडचे पाकीट १० रुपयाला देण्याची केंद्र शासनाची योजना आहे. पुणे शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांनी ५ रुपयांना एक पाकीट आपल्या भागातील महिलांना विकल्यास त्यांना अडीच रुपयांना हे पॅक देऊ. त्यासाठी पुढाकार घेईल, असे श्री. पाटील यांनी सांगितले. त्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन न वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील महिलांपर्यंत ते पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिलांनी संघटित होण्यासाठी महिला आयोगाने सुरू केलेला हा आरोग्य वारीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. राज्य शासनाने वारीसोबत मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये अजून बदल करता येऊ शकतील. वारकरी महिलांनी स्वत:च्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टारगटपणा करणाऱ्यांचे छोटे १ मिनिटांचे व्हिडिओ काढून पाठवावेत. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाही करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

स्त्रिया आणि पुरुष अशा सर्वांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून महिलांची विशेष गरज ओळखून लाडकी बहीण योजना राबविली आहे. त्यामुळे या योजनेविषयी गैरसमज पसरवले जाऊ नयेत. पीएमपीएमएल बसमध्ये टारगट लोक महिलांची, मुलींची नावे टोकदार वस्तुने कोरतात. ती तत्काळ मिटविण्यासाठी व्यवस्था केली जावी. तसेच अशा लोकांचे व्हिडिओ काढून लोकांकडून प्रशासनाकडे पाठविले जातील यासाठी प्रयत्न करा, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या वतीने गेली ४ वर्षे हा उपक्रम राबविला जातो. देहू आळंदीची वारी २२ दिवस तर मुक्ताईनगर येथून ३० दिवस चालते. त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न निर्माण होत असतो. हे लक्षात घेऊन आयोगाने हा पुढाकार घेतला आहे. हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा प्रत्येक १० ते १२ किलोमीटर अंतरावर केल्या आहेत.

३ हजार ५०० न्हाणीघरे पालखी मार्गावर सुविधा केली आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बीट मार्शल सोबत ठेवले आहेत. टोल फ्री क्रमांक चे फलक लावले आहेत. टारगट लोकांकडून त्रास झाल्यास महिलांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. भक्तिमय वारी आरोग्याची वारी व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. महिलांना कोणाकडूनही त्रासाला, गुन्हेगारीला सामोरे झाल्यास पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार करता येईल. कौटुंबिक हिंसाचार च्या अनुषंगाने भरोसा सेल काम करते. समस्या न सुटल्यास आयोगाकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांना सुरक्षिततेचा, प्रगतीचा विश्वास देण्यासाठी आयोग प्रयत्न करत आहे. मुलींचा बालविवाह करू नका. त्यासाठी आई म्हणून महिलांनी भूमिका बजावावी, स्त्रीभ्रूणहत्या होऊ देऊ नये, अनिष्ट रूढी परंपरांविरोधात उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार श्री. तुपे म्हणाले, महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षित आणि स्वच्छ सोहळ्याची जोड या पालखी सोहळ्याला आयोगाने दिली आहे. अनेक महिला वडकी नाका आणि काही महिला दिवे घाटापर्यंत पालखीला पोहोचविण्यासाठी जातात. त्यामुळे या महिलांना परत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्याचा पीएमपीएमएलने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

श्रीमती दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, मागच्या चार पाच दिवसापासून आळंदी आणि देहूला जाण्या- येण्यासाठी जादा बसेसची सुविधा केली आहे. सासवड येथून ११ नियमित बसेस शिवाय ६० जादा बसेस सुरू केल्या आहेत. गर्दीच्या कालावधीत महिलांसाठी विशेष बस सोडण्यात येत आहेत.

प्रास्ताविकात श्रीमती आवडे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून महिला वारकरी देखील आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात. राज्य महिला आयोग महिला भगिनीसाठी विविध उपक्रम राबवित असते. आरोग्य वारी या उपक्रमाच्या माध्यमातून वारी मार्गावर, विसाव्याचे ठिकाण, मुक्कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सामाजिक समतेचा, समाजाला एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील बल्लाळ म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्यावतीने महानगरपालिका हद्दीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी २२ ठिकाणी तर श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी १८ ठिकाणी वैद्यकीय पथकांची सुविधा करण्यात आली आहे. हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. पंढरपूरपर्यंत एक अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.