आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन
भाजपचे आमदार गोपाचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहेत. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुणे पोलिसांना केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या निवेदनानुसार लवासा, बारामती व मगरपट्टा हे तीन वेगवेगळे राज्य करण्यात यावे, या तिन्ही राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असावेत आणि या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करावा ज्याचे पंतप्रधान पवार साहेबांना करावे, असे वक्तव्य करत देशाचे तुकडे करण्याची भाषा केली आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे असून याबाबत गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने देशद्रोषाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच इंदापूर येथील जाहीर सभेत बोलताना “पवार हे या देशाला लागलेली कीड आहे” , असे वक्तव्य करत पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा अवमान केला आहे.यापैकी आदिवासी व मागासवर्गीय या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वडार समजाचे महेश पवार व घिसाडी समाजाचे माधव पवार यांनी त्यांच्या आडनाव व समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
ज्या गुन्हे अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आलं तोच गुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर दाखल करत व आम्हाला देखील न्याय मिळावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली. पुणे शहर पोलीस आयुक्त या घटनेचा गांभीर्याने विचार करून यावर कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
सदर शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे , महेश पवार , माधव पवार , मधुकर पवार , महेश हंडे, शशिकांत जगताप , दिपक कामठे , शुभम मताळे इ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.