अंशदायी वैद्यकीय योजनेतील सदस्यांना वैदकीय विमा देण्यासाठी ब्रोकरची नियुक्ती
| स्थायी समितीत रात्रीच्या वेळी आला प्रस्ताव
महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून २ ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करण्यात आले आहेत. स्थायी समितीने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. विरोध असतानाही विरोध झुगारून आणि ऐन वेळेला म्हणजे रात्री च्या वेळी स्थायी समिती समोर प्रस्ताव आणून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापालिका कर्मचारी आणि कर्मचारी संघटना अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालू राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने देखील केली आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांना तशी खात्री देखील देण्यात आली होती. कारण कर्मचाऱ्यांना ही योजना आपली वाटते. मेडिक्लेम कंपनीच्या ताब्यात ही योजना गेली तर आमचे नुकसान होईल, असा महापालिका कर्मचाऱ्यांचा दावा आहे. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करणार होती. त्यासाठी आरोग्य विभागाने निविदा मागवली होती. मात्र पहिली निविदा रद्द करून फेरनिविदा काढली. त्यानुसार आता २ ब्रोकर ची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेच्या अंशदायी वैदयकीय सहाय योजनेच्या कार्डधारकांकरीता वैदयकीय विमा योजना राबविणेकरीता इन्शुरन्स ब्रोकरची नेमणुक करणे कामी महाटेंडर पोर्टलवर ऑनलाईन एकुण सात निविदा प्राप्त झाल्या. सात निविदाधारकांनी महाटेंडर पोर्टलवर ऑनलाईन अ पाकिटात (टेक्निकल बिड) सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. तांत्रिक छाननीमध्ये सात निविदाधारकांपैकी सहा निविदाधारकांना किमान ५० पेक्षा जास्त अधिक गुण मिळाले आहेत अशा सहा निविदाधारकांना अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचेकडून प्राप्त झालेल्या आदेशान्वये २१/९/२०२२ रोजी विमा संबधी प्रस्ताव सादरीकरण करणेकरीता आमंत्रित करण्यात आले. सहा निविदाधारकांपैकी गलागर इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांनी प्रस्ताव सादरकरीण करणेकरीता अनुपस्थित राहीले. उर्वरीत पाच विमा कंपन्यांनी विमासंबंधी प्रस्ताव सादरीकरण केल्यानंतर दिनांक ३/१०/२०२२ रोजी पुणे महानगरपलिका कामगार युनियन संघटना, पीएमसी डॉक्टर्स असोसिएशन,पुणे महानगरपालिका अभियंता संघ यांचेकडील प्रतिनिधींकरीता उपरोक्त निविदेतील पाच विमा कंपन्याना विमा प्रस्ताव सादरीकरण करणेस पुनश्च आमंत्रित करण्यात आले. ३/१०/२०२२ रोजी पाच विमा कंपन्यांपैकी ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. प्रस्ताव सादरीकरण करणेकरीता अनुपस्थित राहीले. चार निविदाधारकांपैकी (१) रंगनाल इन्शुरन्स ब्रोकिंग अॅन्ड रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि. (२) जे.के.इस ब्रोकर लिमिटेड या दोन निविदाधारकांना प्रत्येकी ९६ समान गुण मिळाले आहेत. यामुळे या दोघांना हे काम देण्यात आले आहे.
ब्रोकर कडून या कामांची अपेक्षा आहे.
१ पुणे मनपाचे संबधित अधिका-यांशी विचारविनियम करून अशंदायी वैदयकीय सहाय योजनेच्या सभांसदाकरीता ग्रुप मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी कृती आराखडा तयार करणे व राबविणे.२ पात्र इन्शुरन्स विमा कंपनीकडून पॉलिसीचा दस्तऐवज (Document) तातडीने प्राप्त करून घेणे.
३ पॉलिसीमध्ये नमुद केलेल्या मनपास पुरक असणा-या अटीशर्ती यांचा सखोल अभ्यास करणे व इन्शुरन्स कंपनीकडून त्याचा पाठपुरावा करणे.
४ तक्रार निवारण केंद्राची स्थापना करून तक्रार निवारण केंद्र सक्षमपणे चालविणे.
५ इन्शुरन्स कंपनीमार्फत नाकारण्यात आलेले दाव्यांचा पुणे मनपाचे संबधित अधिका-यांच्या समन्वयाने सखोल अभ्यास करून दावा निकालीत काढण्यात यावे.
६ पात्र इन्शुरन्स कंपनीबरोबर समन्वय साधून लाभार्थ्याकरीता जनजागृती कार्यक्रम राबविणे व लाभार्थ्याना पॉलिसीविषयक सखोल ज्ञान देणे.
७ पात्र विमा कंपनीकडून दरमहाचा आढावा घेउन अहवाल तयार करणे व तातडीने दावा निकाली काढणे.
८ सदर कामी पुणे मनपामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मदत कक्ष स्थापन करणे.
९ अतिशय सक्षम अशी माहिती व तंत्रज्ञान संगणीकृत प्रणाली तयार करणे.