पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा | पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समाविष्ट गावातील रस्ते आदी प्रमुख पायाभूत सुविधा विकासावर लक्ष केंद्रित करून कामांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या.
पालकमंत्री पाटील यांनी पीएमआरडीएच्या कामकाजाचा आढावा पीएमआरडीए कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार महेश लांडगे, महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त बन्सी गवळी, नगररचना उपसंचालक डी. एन. पवार, महानगर नियोजनकार विवेक खरवडकर, मुख्य अभियंता अशोक भालकर, पुणे मनपाचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
मेट्रो, अग्निशमन केंद्रांचा विकास, सर्वसामान्यांसाठी गृहप्रकल्प अशा ठोस बाबींसारख्या नागरिकांना आवश्यक प्राधान्याच्या बाबी विकसित करण्यावर भर द्यावा. नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विकसित करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माण- हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रकल्पाच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच त्यात अडचणी आल्यास तत्काळ सोडवण्यास प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
यावेळी आयुक्त श्री. महिवाल, अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी तसेच नियोजनकार श्री. खरवडकर यांनी संगणकीय सादरीकरण करून पीएमआरडीएचे कामकाज तसेच मेट्रो प्रकल्पाबाबत माहिती दिली.
बैठकीस प्राधिकरणाचे अग्निशमन विभाग प्रमुख देवेंद्र पोटफोडे, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मोनिका सिंग, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे आदी उपस्थित होते.