जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा
पुणे |: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, संबंधित यंत्रणेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पूल पाडण्यापूर्वी २०० मीटरचा परिसर सायंकाळी ६ वाजता निर्मनुष्य करावा. वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक पोलीस कर्मचारी नेमावेत. पूल पाडल्यानंतर राडारोडा नियोजित वेळेतच बाजूला केला जाईल याची विशेष दक्षता घ्यावी आणि त्यासाठी गरज असल्यास अतिरिक्त वाहने आणि मनुष्यबळ तैनात करावे, असे निर्देश डॉ.देशमुख यांनी दिले.
बाहेरून येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाविषयी माहिती देण्यासाठी एनएचएआयने महामार्गावर ठिकठिकाणी माहितीचे फलक लावावेत. बावधन परिसरातील लहान रस्त्यांवर वाहतूक नियोजनासाठी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावेत. आवश्यतेतनुसार आपत्कालीन नियोजन तयार ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त श्री.शिंदे यांनी दिले.
पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी पूल पाडण्याच्या वेळेत करण्यात येणाऱ्या वाहतूक नियोजनाची माहिती दिली.
असा पाडला जाईल जूना पूल
पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण ३५ मिमी व्यासाचे १ हजार ३०० छिद्र पाडण्यात आले आहे. ६०० किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग करण्यात येणार आहे. १ हजार ३५० डिटोनेटरचा उपयोग नियंत्रीत पद्धतीने ब्लास्ट करण्यासाठी करण्यात येणार आहे. ब्लास्ट एक्स्पर्ट आनंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे करण्यात येत आहेत. रविवारी (२ ऑक्टोबर रोजी) पहाटे सर्व तयारी वेळेवर झाल्यास पहाटे १ ते २ च्या दरम्यान पूल पाडण्यात येईल.
पूल पाडतांना त्याचे तुकडे अथवा धूळ परिसरात उडू नये यासाठी ६ हजार ५०० मीटर चॅनल लिंक्स, ७ हजार ५०० वर्ग मीटर जिओ टेक्स्टाईल, ५०० वाळूच्या पिशव्या आणि ८०० वर्ग मीटर रबरी मॅटचा वापर आच्छादनासाठी करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून २०० मीटर परिघातील इमारतीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येणार आहे.
पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री
पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी एनएचएआयतर्फे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री उपयोगात आणली जात आहे. १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर आणि पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी संबंधित यंत्रणतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.
सुरक्षा बंदोबस्त आणि वाहतूक नियोजनासाठी पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे एकूण ३ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, १९ पोलीस निरीक्षक, ४६ सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तसेच ३५५ पोलीस कर्मचारी असे एकूण ४२७ पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त् करण्यात आले आहेत. नागरिकांनी पूल पाडण्याच्या वेळेत चांदणी चौक परिसरात येऊ नये आणि पोलीसांनी दिलेल्या वाहतूक विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.