10th and 12th exams  | दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या | जाणून घ्या काय आहे तारीख

HomeपुणेBreaking News

10th and 12th exams | दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या | जाणून घ्या काय आहे तारीख

Ganesh Kumar Mule Sep 20, 2022 3:08 AM

Balasaheb Thackeray Aapala Davakhana | राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
Temple on Bhandara Hill | भंडारा डोंगरावर साकारतेय नागरशैलीतले महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर
Weather update : राज्यातील तापमानाचा पारा वाढला!

दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या | जाणून घ्या काय आहे तारीख

राज्य मंडळातर्फे परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

 

राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा ०२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.

फेब्रुवारी मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. –

१. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम – लेखी परीक्षेचा कालावधी मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ ते सोमवार २० मार्च २०२३
२.माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा – गुरुवार ०२ मार्च २०२३ ते शनिवार २५ मार्च २०२३

हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावर संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला प्रविष्ट व्हावे.  अन्य कोणत्याही संकेतस्थळावर किंवा यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. वेळापत्रकाबबात काही हरकती, सूचना असल्यास विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, त्यानंतर पाठवण्यात आलेल्या सूचनांचा विचार केला जाणार नाही. असे कळवण्यात आले आहे.