कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकरमाफी
| शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना, वाहनांना राज्य शासनाने पथकर माफी जाहीर केली असून त्याचे जिल्ह्यात काटेकोर पालन करत गणेशभक्तांना कोणत्याही असुविधेला सामोरे जावे लागू नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही पथकर माफी असणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पुण्यातून जाणाऱ्या मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (एनएच ४८) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेश भाविकांच्या वाहनांना ही पथकर माफी देण्याबाबत शासन परिपत्रकानुसार निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पथकर माफी देण्यात आली होती. हा अनुभव लक्षात घेऊन पथकर माफीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
डॉ. देशमुख म्हणाले, या परिपत्रकानुसार टोलमाफी देण्याचे पथकर नाके चालकांना निर्देश देण्यात आले असून पथकर नाक्यांच्या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यातील पथकर माफी पास उपलब्ध करुन देण्यात येतील. पोलीस विभाग आणि परिवहन विभागाच्या समन्वयातून हे काम केले जाईल.
पथकर माफीसंदर्भातील निर्णयाची माहिती देण्यासाठी पथकर नाके चालकांनाही या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी करून घेण्यात आले होते.