गौरी गणपती येण्या अगोदर मनपा कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळणार का?
| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा
पुणे | महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम अदा करणे बाबतची संगणक प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार लेखा व वित्त विभागाने परिपत्रक देखील जारी केले होते. 5 ऑगस्ट पर्यंत ही बिले तपासून घेण्याचे आदेश लेखा विभागाने सर्व विभागांना दिले होते. मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना अजूनही रक्कम मिळालेली नाही. संगणक विभाग कडील तांत्रिक चुकीमुळे हा उशीर होत आहे. असे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसावर गौरी आणि गणपती उत्सव आला आहे. याच्या अगोदर तरी रक्कम मिळणार का, याकडे महापालिका कर्मचारी डोळे लावून बसले आहेत.
पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हम्याची रक्कम दर वर्षी जून महिन्याच्या मासिक वेतन देयकाबरोबर माहे जुलै मध्ये रोखीने अदा करणेबाबत लेखा विभागाकडून अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदन सादर केले होते. त्यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “एकूण कर्मचारी संख्या व आवश्यक निधी बाबत विचारणा केलेली होती. त्यानुसार लेखा विभागाने संगणक विभागाकडे याबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार संगणक विभागाने याबाबतची संगणक प्रणाली अद्ययावत केली आहे. आता सर्व जबाबदारी ही लेखा व वित्त विभागाची होती. लेखा विभागाचे परिपत्रक आल्यानंतर बिले काढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर रक्कम मिळणार आहे. मात्र आता फार उशीर न लावता ही रक्कम लवकर मिळावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करत होते. त्यानुसार हे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र चालू महिन्यात देखील अजूनपर्यंत हफ्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही.
याबाबत लेखा व वित्त विभागाकडून सांगण्यात आले कि, सांखिकी विभागा कडील प्रणाली मध्ये तांत्रिक चुका आहेत. एकूण १९१ बिले बनवायची आहेत. मात्र चुकामुळे बिले बनवताना उशीर होत आहे. बिले आल्यानंतर आम्ही तत्काळ तपासून आम्ही रक्कम खात्यावर जमा करू शकतो, मात्र त्यासाठी सांखिकी विभागाने अचूक काम करणे आवश्यक आहे, असे लेखा विभागाचे म्हणणे आहे. तर सांखिकी व संगणक विभाग म्हणतो आहे कि, आमचे सगळे online काम सुरु आहे. आम्ही २५ ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण करू शकतो.
यामध्ये दोन्ही विभागांनी समन्वय साधत गौरी गणपती येण्या अगोदर महापालिका कर्मचाऱ्यांना रक्कम द्यावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करत आहेत. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का? हा खरा सवाल आहे.