पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ | मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा
| निवडणूक विभागाची शिक्षण विभागाकडे मागणी
पुणे | आगामी महापालिका निवडणुकीची महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचनेननंतर आता मतदारयाद्या देखील अंतिम करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निवडणूक विभागाने शिक्षण विभागाकडे केली आहे.
याबाबत निवडणूक विभागाचे उपायुक्त यशवंत माने यांनी शिक्षण विभागाला तसे पत्र दिले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात असून तद्नंतर लवकरच तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामकाजास सुरुवात करण्यात येणार आहे. सदर निवडणूकीकरिता पुणे शहरातील प्रभागनिहाय ठरविलेल्या विविध मतदान केंद्रांवर मतदारांकडून मतदान केले जाणार असून अशा ठरविलेल्या मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या अधिकारी/कर्मचारी आणि मतदारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले विभागांतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करून काही दुरुस्ती असल्यास किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यास त्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधून त्या दुरुस्त करून घेऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेकामी आपणाकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना योग्य ते आदेश होणेस विनंती आहे. असे पत्रात म्हटले आहे.