घरच्या घरीच करा बाप्पाचे विसर्जन!
: महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन
: घराच्या घरी मूर्ती विसर्जनासाठी २०० मे.टन अमोनियम बायकार्बोनेट
पुणे: घराच्या घरी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरीता पुणे महानगरपालिकेमार्फत एकूण २०० मे.टन अमोनियम बायकार्बोनेट सर्व क्षेत्रिय कार्यालयांना मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील एकूण २४७ मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी, सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व आरोग्य कोठ्यांच्या ठिकाणी आणि गणेश मंडळाच्या ठिकाणी सर्व नागरीकांस अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे मोफत वाटप करण्यात येत आहे. तरीही कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन करावे’, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
: २४७ मूर्ती संकलन केंद्रांवरही मूर्तीसंकलन करता येणार
गणेश विसर्जनासंदर्भात महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती देताना महापौर मोहोळ यांनी हे आवाहन केले आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांमधील नागरिकांना सरासरी १२-१३ टन अमोनियम बायकार्बोनेट वितरीत करण्यात आले आहे.
महापौर मोहोळ म्हणाले, ‘यंदाच्या गणेश विसर्जनासाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच ज्या नागरिकांस घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही’ अशा नागरिकांसाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दीडशेपेक्षा जास्त मूर्ती विसर्जन रथ अर्थात फिरत्या हौदांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे महानगरपालिका स्वच्छ सहकारी संस्थेमार्फत एकूण ८७ हजार ४४२ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले होते. या वर्षी देखील सर्व गणेशमूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निर्माल्याचे खत निर्माण केले जाते आणि हे खत पुढे महानगरपालिकेच्या उद्यानांसाठी वापरले जाते आणि शेतक-यांना मोफत दिले जाते. यामधील फुलांच्या निर्माल्यापासून पर्यावरणपूरक उदबत्ती कमिन्स इंडिया कंपनीच्या सौजन्याने तयार केले जाते’, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.
: निर्माल्याचे वेगळे संकलन करून ठेवावे
‘गेल्या वर्षी फिरत्या हौदांमध्ये ८२ हजार ५५१ मूर्ती विसर्जन आणि संकलन केंद्रावर ७९ हजार ७७७ मूर्ती संकलन असे एकूण १ लाख ६२ हजार ३२८ गणेश विसर्जन झाले होते. यंदाही नागरिकांनी निर्माल्याचे वेगळे संकलन करून ठेवावे. हे सर्व निर्माल्य आपल्या दारात येणाऱ्या कचरा वेचकांमार्फत अथवा घंटागाडीमार्फत ओला सुका कचरा व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोत्यांमधून दि. १२, १५ आणि २० सप्टेंबर २०२१ रोजी घेतले जाईल. कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टीचा समावेश असावा. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकॉल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मुर्त्या किंवा त्यांचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ टाकू नयेत. हे प्रासादिक निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतक-यांना देण्यात येते, म्हणूनच या प्रासादिक निर्माल्याचे पावित्र्य भंग पावेल अशा कुठल्याही वस्तू किंवा इतर कचरा निर्माल्यात टाकू नयेत.
COMMENTS